For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'वाटणी' फिसकटली अन् खुनाला वाचा फुटली!

12:30 PM Jun 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
 वाटणी  फिसकटली अन् खुनाला वाचा फुटली
Advertisement

विधिविज्ञानमधील अधिकाऱ्यांची फितुरी : याआधीही पोस्टमॉर्टेम अहवाल बदलल्याचा संशय, ब्लॅकमेल करणारा युट्यूबर मोकाट

Advertisement

बेळगाव : हुक्केरी व गोकाक तालुक्यात घडलेल्या दोन खळबळजनक खून प्रकरणांनी जिल्हा हादरला आहे. एका प्रकरणामुळे तर शासकीय यंत्रणांवरही संशय निर्माण झाला आहे. 2 कोटींच्या विमा रकमेसाठी आपल्या प्रियकराच्या मदतीने कुंकवाच्या धन्याचा सलाईनमध्ये विष घालून काटा काढल्याची एक घटना आहे. तर प्रेयसीसाठी शीतपेयात विष घालून एका युवकाने आपल्या पत्नीचा काटा काढल्याची दुसरी घटना आहे.

घोडगेरी, ता. हुक्केरी येथील माजी सैनिक संदीप कलगौडा मंजरगी (वय 46) यांच्या खून प्रकरणी पत्नी सुमा, तिचा प्रियकर पुंडलिक डोंबरसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये विधिविज्ञान प्रयोगशाळेतील तिघा जणांचाही समावेश आहे. आपल्या पतीचा मृत्यू विषप्रयोगाने नाही तर अपघाती झाला आहे, हे भासविण्यासाठी सुमाने शासकीय यंत्रणेला कशा पद्धतीने हाताशी धरले, हा प्रकार कसा बाहेर पडला? याची कथाच उत्कंठावर्धक आहे.

Advertisement

खून प्रकरण दडपण्यासाठी विधिविज्ञान प्रयोगशाळेतील अहवाल बदलण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी आदी अधिकाऱ्यांच्या जागरुकतेमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. सध्या हे प्रकरण पुढील तपासासाठी घटप्रभा पोलिसांकडे सोपविले आहे. मात्र, तपासाचा वेग कमी झाल्याचे दिसून येत आहे. माजी सैनिक संदीप मंजरगी (वय 46) हा किरकोळ अपघातात जखमी झाला होता. त्याच्यावर घटप्रभा येथील एका खासगी इस्पितळात त्याच्यावर उपचार करण्यात येत होते.

पत्नी सुमाने आपला प्रियकर पुंडलिक डोंबरच्या मदतीने विष मागवून सलाईनमधून पतीला विष दिले व त्याचा काटा काढला. एकीकडे प्रियकरावरील प्रेम तर दुसरीकडे 2 कोटींची विमा रक्कम यामुळे सुमाने आपल्या पतीचा काटा काढला आहे. दोन दिवसांपूर्वीच सुमाची आई महादेवी मल्लाप्पा बदामी (वय 64) राहणार घोडगेरी या वृद्धेने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी तिलाही चौकशीसाठी बोलावले होते. पतीचा काटा काढल्यानंतर खून प्रकरण दडपण्यासाठी सुमा विधिविज्ञान प्रयोगशाळेपर्यंत कशी पोहोचली, त्यासाठी तिने काही सरकारी अधिकाऱ्यांची मदत कशी घेतली? याविषयीची माहिती थक्क करणारी आहे.

हिडकल डॅम परिसरात एका स्थानिक डॉक्टरच्या मदतीने हे प्रकरण हाताळण्यात आले. पोलीस आयुक्त कार्यालयातील क्लार्क अशोक गुजनाळ, विधिविज्ञान प्रयोगशाळेतील आप्पासाब नाईकवाडी, चन्नाप्पा आडवीस्वामीमठ, नागराज पी. एम.  यांना अटक झाली आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी सुमाने 3 लाख रुपये खर्च केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुमा व तिचा प्रियकर पुंडलिक यांच्यात पैसे वाटपाचा करार झाला होता. पती निधनानंतर हा करार मोडला. त्यामुळे पुंडलिकने काही ठिकाणी घडला प्रकार सांगितला. गोकाक तालुक्यातील एका युट्यूबरला यासंबंधीची माहिती मिळाली. त्यानेही सुमाला ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. माजी सैनिकाच्या पत्नीला एकांतात बोलावण्याइतकी युट्यूबरची मजल गेली होती.

युट्यूबरवर कारवाई का नाही?

गेल्या आठवड्यात जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी या प्रकरणाची माहिती दिली होती. त्यानंतर युट्यूबरला अटक होईल अशी अपेक्षा होता. अद्याप पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले नाहीत. एका माजी सैनिकाचे खून प्रकरण दडपण्यासाठी महिलेबरोबर डील करून तिला एकांतात बोलावणाऱ्या युट्यूबरवर कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 13 मार्च रोजी माजी सैनिक संदीप मंजरगी अपघातात जखमी झाला होता. त्याच दिवशी त्याला घटप्रभा येथील खासगी इस्पितळात दाखल केले होते. सलाईनमधून विषप्रयोग केल्यामुळे 15 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुरुवातीला यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला होता. त्यांनी चाणाक्षपणे एका खळबळजनक खून प्रकरणाची उकल करण्याबरोबरच 11 जून रोजी घोडगेरी येथे दफन केलेला मृतदेह प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उकरून काढून नऊ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर तपासाची गती मंदावली आहे.

पैशासाठी रिपोर्ट बदलण्याचा धंदा

या प्रकरणामुळे विधिविज्ञान प्रयोगालयातून येणाऱ्या अहवालांवर संशयाचे वलय निर्माण झाले आहे. पैशासाठी रिपोर्ट बदलण्याचा धंदा कधीपासून सुरू आहे? याचीही चौकशी होण्याची गरज आहे. कारण, एखाद्या गुन्हेगारी प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा व्हायची असेल तर प्रयोगशाळेचा अहवाल महत्त्वाचा असतो. इतक्या सहज पद्धतीने काही लाख रुपयात तेथील अहवाल बदलणे शक्य असेल तर यापूर्वीही असे प्रयत्न कोणी केले आहेत का? याचीही चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, पहिल्यांदा आलेल्या शवचिकित्सा अहवालात माजी सैनिकाच्या शरीरात विष असल्याचा उल्लेख नाही. मृतदेह उकरून काढल्यानंतर पुन्हा ज्यावेळी पोस्टमॉर्टेम झाले, त्या अहवालात मात्र विषप्रयोगातून त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे केवळ बेळगावच नव्हे तर संपूर्ण राज्यात या घटनेने खळबळ माजली असून खून प्रकरणाच्या चौकशीची गती का मंदावली? युट्यूबरला अद्याप का अटक झाली नाही? याची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :

.