For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरियाणात दुभंग...

06:46 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
हरियाणात दुभंग
Advertisement

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये बंडाळी माजली असतानाच काँग्रेस व आपमध्येही दुभंग निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे हरियाणाच्या निवडणुकीत या तिन्ही पक्षांचा चांगलाच कस लागण्याची चिन्हे आहेत. हरियाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. राज्यात 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच वातावरण तापायला सुऊवात झाली आहे. मागच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक 40, तर काँग्रेसने 31 जागांवर सरशी साधली. तर दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीने 10 जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतर भाजपाने जेजेपीला सोबत घेत सत्ता स्थापना केली. मागच्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, यंदाची निवडणूकही चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता आहे. हरियाणात काँग्रेसचा हक्काचा मतदार असून, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचाही चांगला प्रभाव आहे. इंडिया आघाडीत दोन्ही पक्ष एकत्र असल्याने हरियाणातही त्यांची युती होण्याची लक्षणे होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपसोबत आघाडी करण्याच्या प्रस्तावाचा विचार करावा, अशी सूचना स्थानिक नेत्यांना केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका सुऊ झाल्या होत्या. मात्र, जागावाटपावरून या दोन्ही पक्षांमध्ये बेदिली निर्माण झाल्याचे पहायला मिळते. विधानसभेसाठी आपने किमान 10 जागांची मागणी केली होती. मात्र, पाचपेक्षा अधिक जागा देणार नाही, असा पवित्रा काँग्रेसकडून घेण्यात आला. त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. काँग्रेसने आत्तापर्यंत 41 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. 49 उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झाली नसली, तरी ती कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. तर आपने 20 उमेदवारांची नावे जाहीर केली असून, जवळपास 50 उमेदवार रिंगणात असतील, असे या पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला तडे गेल्याचे मानले जाते. भाजपसाठी ही दिलासादायकच बाब ठरावी. असे असले, तरी भाजपची वाटही या निवडणुकीत खडतर असेल. विधानसभा निवडणुकीचे तिकीट वाटप होताच पक्षाच्या अनेक नेत्यांनी बंडात्मक पवित्रा घेतल्याचे दिसून येते. अवघ्या 24 तासांत पक्षातील जवळपास 32 मोठ्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. यात 1 मंत्री, 1 आमदार व 5 माजी आमदारांचा समावेश आहे. माजी मंत्री सावित्री जिंदल आणि मंत्री रणजीत चौटाला यांच्या निर्णयामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. सावित्री जिंदल हरियाणातील मोठे प्रस्थ असून, खासदार नवीन जिंदल यांच्या मातोश्री आहेत. मुख्य म्हणजे ही नाराजी केवळ पक्षाच्या नेत्यांच्या राजीनाम्यापुरती सीमित राहिलेली नाही. अगदी ग्रामपातळीवरील नेत्यांपर्यंत निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. हा सगळा पक्षांतर्गत असंतोष दूर करणे, हे भाजपापुढचे प्रमुख आव्हान असेल. लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. 370 चा नारा देणाऱ्या भाजपाला स्पष्ट बहुमतपासूनही वंचित रहावे लागेल. अखेर मित्र पक्षांना सोबत घेऊन एनडीएचे सरकार स्थापन करावे लागेल. स्वाभाविकच लोकसभेनंतर होणारी हरियाणा, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर व झारखंड या चार राज्यांतील विधानसभा निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी कसोटीची असेल. मुख्य म्हणजे हरियाणा विधानसभेत शेतकरी आंदोलनाचा मोठा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसोबतच कुस्तीपटूंच्या आंदोलनाचाही निवडणूक निकालावर परिणाम होऊ शकतो. कुस्तीपटू विनेश फोगाटदेखील काँग्रेसकडून मैदानात उतरली आहे. विनेशने यापूर्वी कुस्तीपटूंच्या आंदोलनात सहभाग घेतला. ब्रजभूषण सिंह यांच्याविरोधात थेट भूमिका घेतल्याने ती चर्चेत आली होती. पॅरिस ऑलिंपिकमध्ये किंचित वजन अधिक भरल्याने तिला पदकापासून दूर रहावे लागले. त्यामुळे तिच्याबद्दल लोकांमध्ये एकप्रकारची सहानुभूती आहे. ही सहानुभूती काँग्रेसला फायदेशीर ठरू शकते. याशिवाय विनेशच्या माध्यमातून भाजपाला घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. हरियाणात सरकारी कर्मचाऱ्यांमधील असंतोष व जाट समाजाची भूमिकाही महत्त्वाची राहू शकते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हरियाणात भाजपला देदीप्यमान यश मिळाले. पक्षाने 10 पैकी 10 जागा जिंकल्या. या खेपेला मात्र पक्षाला केवळ पाचच जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने दिग्गज नेते मनोहरलाल खट्टर यांच्याऐवजी नायबसिंग सैनी यांच्याकडे नेतृत्व सोपविले. मात्र, पक्ष व पक्षनेतृत्वाच्या एकूणच कामगिरीबद्दल जनता समाधानी दिसत नाही. महागाई व बेरोजगारी हे मुद्दे सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरू शकतात, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. तथापि, स्वच्छ व पारदर्शक प्रशासनाच्या स्तरावर सरकारबाबत लोकमत अनुकूल असल्याचेही सांगण्यात येते. एकूणच हरियाणातील राजकीय समीकरणांचा विचार केला, तर भाजपपेक्षा काँग्रेस आज अधिक मजबूत स्थितीत दिसत आहे. परंतु, प्रत्येक निवडणूक गांभीर्याने व नेटाने लढविण्याकडे भाजपाचा कल असतो. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवडणुका फिरविण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांची रणनीती काय असणार, हे पाहणेही औत्सुक्याचे राहील. हरियाणाबरोबरच जम्मू व काश्मीरमध्येही विधानसभेचा रणसंग्राम होणार आहे. या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झाला, तरी नवल वाटण्याचे कारण नाही. महाराष्ट्रात सध्या भाजप, शिंदेसेना व अजितदादा गटाचे सरकार आहे. मात्र, या तिन्ही पक्षांमध्ये ताळमेळ दिसत नाही. भाजपमध्ये तर आत्तापासूनच गळती सुरू झाली आहे. दादा गटही वेगळ्याच पवित्र्यात दिसत आहे. तर महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण पहायला मिळत आहे. हे बघता महाराष्ट्रातील स्थिती महायुतीसाठी काहीशी चिंताजनकच. अशातच हरियाणा वा जम्मू काश्मीरमध्ये पक्षाला फटका बसला, तर महाराष्ट्र तसेच झारखंडमध्ये वेगळा मॅसेज जाऊ शकतो. हे बघता ही निवडणूक जिंकणे, ही भाजपाची गरज असेल. त्याचबरोबर हरियाणात जेजेपी व आझाद समाज पार्टी यांचा प्रभाव किती राहणार, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. त्यांचा कुणाला फटका बसणार, हे पाहणेही औत्सुक्याचे असेल. एकूणच हरियाणाच्या रणसंग्रामाकडे देशाचे लक्ष असेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.