For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वचालक भगवंत यज्ञ व तपाचे भोत्ते असून सगळ्यांचे सोयरे आहेत

06:30 AM Apr 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
विश्वचालक भगवंत यज्ञ व तपाचे भोत्ते असून सगळ्यांचे सोयरे आहेत
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

भगवंत म्हणाले, मन व बुद्धी यांचे नियमन केलेल्या योग्याचे मोक्ष मिळवणे हेच ध्येय असते. त्याच्या इच्छा, भय आणि क्रोध नाश पावलेले असतात. त्यामुळे तो सर्वदा मुक्तच समजावा. ज्यावेळी प्राणापानांच्या निरोधाने मन शांत होते, त्यावेळी नानाप्रकारच्या इच्छा होणे थांबते. ज्या मनाच्या पडद्यावर संसारचित्र उमटते ते मनच जर निर्विचार झाले तर तो मनोरूपी पडदा फाटून जातो. पाण्यात प्रतिबिंब दिसते पण जर पाणीच आटले तर प्रतिबिंब कसे दिसणार? योग्याने मन निर्विचार केलेले असल्याने त्याला मी कर्ता आहे ही भावनाच होत नाही. येथेच आपल्यातला आणि योग्यातला फरक स्पष्ट होतो. योग्याने मन निर्विचार केलेले असल्याने त्याला मी कर्ता आहे ही भावनाच होत नाही. मनातील एखाद्या कल्पनेवर पूर्ण विचारांती आपण जेव्हा एखादा निष्कर्ष काढतो तेव्हा त्या गोष्टीबद्दल आपली भावना पक्की झालेली असते. उदाहरणार्थ एखादा परीक्षेत उत्तम गुण मिळवून पास झाल्याचे समजले की, आपण कोणताही विचार न करता सहज म्हणतो वा वा फार छान झालं किंवा एखादी दु:खद वार्ता ऐकली की, अरेरे फार वाईट झालं असे शब्द आपल्या मुखातून लगेच बाहेर पडतात. येथे सुखाची किंवा दु:खाची भावना पक्की असते. त्यावर वेगळा विचार करण्याची आपल्याला गरज वाटत नाही. त्याप्रमाणे योग्याची मी म्हणजे हा देह नाही ही भावना पक्की झालेली असल्याने मी कर्ता आहे हा विचार त्याच्या मनातसुद्धा येत नाही. म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो. पुढील श्लोकात भगवंत मी यज्ञ व तप यांचा भोक्ता, सर्व लोकांचा सोयरा असून सगळ्यांचा मित्र आहे अशी भावना बोलून दाखवतात. भगवंतांनी बोलून दाखवलेली भावना ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे म्हणायला हरकत नाही. हे जो जाणून असतो त्याला शांती प्राप्त होते.

भोक्ता यज्ञ-तपांचा मी सोयरा विश्व-चालक । जाणूनि ह्यापरी माते शांतीस वरिला चि तो ।। 29 ।।

Advertisement

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की, देहात असतानाच जे ब्रह्मभावाला पावतात त्यांच्याबद्दल मी तुला बोललो. त्यांनी यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडलेले असतात म्हणून ते पलीकडच्या तीराला लागून ब्रह्मत्वाला पोहोचतात.  योगदर्शन शास्त्रानुसार अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, धारणा, ध्यान आणि समाधी हे अष्टांग योगमार्गातील यमनियम आहेत. त्यांच्या पालनाने साधकाने नैतिकतेचा कळस गाठल्यावर त्याचे मन आत्मस्वरुपावर एकाग्र होते. साधना करताना यमनियमांच्या पालनात होणाऱ्या चुका लक्षात घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याचा अभ्यास साधकाला परिपूर्ण होण्यासाठी वारंवार करावा लागतो. हे यमनियमांचे डोंगर चढायला अत्यंत कठीण असून त्यावर चढण्याचा सराव न डगमगता करावा लागतो. त्यासाठी अभ्यासाची अत्यंत आवश्यकता असते. तो अभ्यास समुद्रासारखा मोठ्या प्रमाणात असतो. यमनियमांच्या पालनाची खडतरता लक्षात यावी म्हणून माउली त्यांना डोंगराची उपमा देतात आणि त्यावर चढाई करून यश मिळवण्यासाठी करावयाच्या अभ्यासाचे मोठे प्रमाण समजावे म्हणून माउली त्या अभ्यासाला समुद्राची उपमा देतात.

-अध्याय पाचवा समाप्त

Advertisement
Tags :

.