दैवी, असुरी आणि राक्षसी स्वभाव
अध्याय दहावा
पूर्वकर्मानुसार दैवी, असुरी किंवा राक्षसी या तीनपैकी एका प्रकारचा स्वभाव माणसाला लाभतो. तो जन्मजात असल्याने सहसा बदलत नाही. सत्वगुणापासून दैवी, रजोगुणापासून असुरी व तमोगुणापासून राक्षसी वृत्ती किंवा स्वभाव तयार होतो. असुरी किंवा राक्षसी वृत्ती माणसाचे अधिकाधिक अध:पतन घडवून आणते हे लक्षात घेऊन माणसाने सत्वगुणाची वाढ करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उध्दार होण्याच्या दृष्टीने त्याची वाटचाल सुरु होऊ शकते. त्यादृष्टीने या तिन्ही प्रकृतींची गुणवैशिष्ट्यो बाप्पा या अध्यायात सांगणार असून सत्वगुणाची वाढ होण्यासाठी काय करायला हवं त्याबद्दल उपदेश करणार आहेत. असुर आणि राक्षस हे शब्द साधारणपणे समानार्थी म्हणून वापरले जातात परंतु त्यात काय फरक आहे तो आधी आपण समजून घेऊ.
असुरी प्रवृत्तीचे लोक रजोगुणसंपन्न असतात. त्यांच्यात अतिवाद, अहंकार, घमेंड, अज्ञान, क्रोध असे गुण ठासून भरलेले असतात. हे लोक परमेश्वराचे उपासक असतात पण अहंकारापोटी ते आपला नाश ओढवून घेतात. असु ह्या शब्दाचा अर्थ प्राण असा आहे, ज्यांच्याकडे असलेल्या प्राणशक्तीमुळे जे दमदार असतात ते असुर होत. अशा लोकांना जीवनातील भोग भोगण्याची तीव्र लालसा असते.
असुरांपासून थोडेसे वेगळे, देवांचे आणि मानवांचे मुख्य शत्रू म्हणून राक्षसांचा उल्लेख होतो. ऋग्वेदात यांचा उल्लेख आढळतो. ते सूक्ष्म व मायावी असतात. पुढील श्लोकापासून बाप्पा वरील तिन्ही प्रकृतींच्या माणसाची स्वभाव वैशिष्ट्यो सविस्तर सांगणार आहेत.
आद्या संसाधयेन्मुक्तिं द्वे परे बन्धनं नृप ।
चिन्हं ब्रवीमि चाद्यायास्तन्मे निगदतऽ शृणु ।। 2 ।।
अर्थ- हे नृपा, यांपैकी पहिली मुक्ति प्राप्त करून देते व दुसऱ्या दोन बंधन प्राप्त करून देतात. तिन्ही प्रकृतींची चिन्हे मी सांगतो ती ऐक.
अपैशून्यं दयाऽ क्रोधश्चापल्यं धृतिरार्जवम् ।
तेजोऽ भयमहिंसा च क्षमा शौचममानिता।। 3।।
इत्यादि चिन्हमाद्याया आसुर्याऽ शृणु सांप्रतम् ।
अतिवादोऽ भिमानश्च दर्पो ज्ञानं सकोपता।। 4।।
आसुर्या एवमाद्यानि चिन्हानि प्रकृतेर्नृप ।
निष्ठुरत्वं मदो मोहोऽ हंकारो गर्व एव च ।। 5 ।।
द्वेषो हिंसाऽ दया क्रोध औद्धत्यं दुर्विनीतता।
आभिचारिककर्तृत्वं क्रूरकर्मरतिस्तथा ।।6 ।।
अविश्वासऽ सतां वाक्येऽ शुचित्वं कर्महीनता।
निन्दकत्वं च वेदानां भक्तानामसुरद्विषाम्।।7।।
मुनिश्रोत्रियविप्राणां तथा स्मृतिपुराणयोऽ ।
पाखण्डवाक्ये विश्वासऽसंगतिर्मलिनान्मनाम्।। 8।।
सदम्भकर्मकर्तृत्वं स्पृहा च परवस्तुषु ।
अनेककामनावत्त्वं सर्वदाऽ नृतभाषणम् ।। 9।।
परोत्कर्षासहिष्णुत्वं परकृत्यपराहतिऽ।
इत्याद्या बहवश्चान्ये राक्षस्याऽ प्रकृतेर्गुणाऽ।। 10 ।।
अर्थ-शठवृत्तीचा अभाव, दया, अक्रोध, चपलता, धैर्य, सरळपणा, तेज, अभय, अहिंसा, क्षमा, शौच, मानाचा अभाव इत्यादि पहिल्या म्हणजे दैवी प्रकृतीचे चिन्ह आहे. आता असुरीचे चिन्ह ऐक. बडबड, अभिमान, गर्व, ज्ञान, क्रोधयुक्तता इत्यादि असुरी प्रकृतीची चिन्हे आहेत. निष्ठुरता, मद, मोह, अहंकार, गर्व, द्वेष, हिंसा, दयाहीनता, क्रोध, उद्धटपणा, विनयहीनता, चेटूक करणे, क्रूर कर्माची आवड, सज्जनांच्या शब्दांवर अविश्वास, अशुचित्व, कर्महीनता, वेदांची, भक्तांची, देवांची, ऋषींची, श्रुतिपारंगत ब्राह्मणांची, तशीच स्मृतींची व पुराणांची निंदा करणे, पाखंड वाक्यांवर विश्वास, मलिनचित्त मनुष्यांची संगती, दंभयुक्त कर्म करणे, परवस्तूचा अभिलाष, अनेक इच्छा असणे, सर्वदा असत्य भाषण करणे, परोत्कर्षात असहिष्णुत्व, दुसऱ्यांच्या कृत्यामध्ये विघ्न आणणे इत्यादि आणि इतरही कित्येक राक्षसी प्रकृतीचे गुण आहेत.
क्रमश: