समाजात फूट पाडणे हेच भाजपचे यश
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची टीका : बेंगळुरात काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन समारंभ : देशासाठी भाजपचे काहीच योगदान नाही
बेंगळूर : देश आणि समाजाचे विभाजन करणे हेच भाजपचे यश आणि काम आहे. या देशासाठी भाजपचे योगदान काहीच नाही, अशी टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. बेंगळूर येथील केपीसीसी कार्यालयात आयोजित काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या समारंभात ते बोलत होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, भाजपचे मूळ असलेल्या आरएसएसनेही देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही. स्वातंत्र्यलढ्यादरम्यान, आरएसएसने ब्रिटिशांशी हातमिळवणी केली. भारत छोडो चळवळ किंवा असहकार चळवळीसारख्या कोणत्याही चळवळीत आरएसएसने भाग घेतला नाही. आता संघाचे लोक देशभक्तीबद्दल बोलतात. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही. संघाचे नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या केली, असे त्यांनी सांगितले.
संघाचे लोक सुऊवातीपासूनच महात्मा गांधींचा द्वेष करत होते. आताही केंद्र सरकारने द्वेष करायला सुऊवात केली आहे. नरेगा योजनेतून त्यांनी महात्मा गांधींचे नाव वगळले आहे. ते देशभक्त नाहीत. संघाचे लोक देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ इच्छित नव्हते. जवाहरलाल नेहरु हे आधुनिक भारताचे जनक आहेत. लाल बहादूर शास्त्री हे देशाला जय जवान जय किसान मंत्र देणारे आहेत. इंदिरा गांधी सामाजिक न्यायाच्या जनक तर गरीबी हठाओ हा नारा इंदिरा गांधींनी दिला होता. इंदिरा गांधींनी आणि जगजीवन राम यांनी हरित क्रांती घडवून आणल्यामुळे देशात अन्न स्वयंपूर्णता आली, असेही सिद्धरामय्यांनी स्पष्ट केले.
राजीव गांधी यांनी देशाला 21 व्या शतकात नेले. असे असताना भाजपचे देशासाठी काय योगदान आहे? भाजपमध्ये सामील झालेले वाजपेयी केवळ पंतप्रधान होते. परंतु काँग्रेसने देशासाठी अधिक योगदान दिले आहे. आम्ही काँग्रेस नेते असल्याचा अभिमान आहे. संविधान तयार झाल्यानंतर देशातील लोकांना समान संधी मिळाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातिव्यवस्थेतील असमानता दूर करण्यासाठी संविधान लागू केले. भारतीय लोकशाही सामाजिक पायावर आधारित आहे असे आंबेडकरांनी म्हटले होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पंचायतींमध्ये गॅरंटी मेळावा
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी, राज्यात काँग्रेस सरकारने लागू केलेल्या पाच गॅरंटी योजनांना कोणतेही सरकार थांबवू शकत नाही. राज्यातील गॅरंटी योजना देशासाठी एक आदर्श आहेत. भाजपने देशातील अनेक राज्यांमध्ये हेच राबवले आहे. गॅरंटी योजनेच्या यशाच्या आधारे प्रत्येक पंचायतीत गॅरंटी उत्सव आणि मेळावा साजरा करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
काम करणाऱ्यांनाच मिळणार तिकीट
तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुका जवळ येत आहेत. या निवडणुकांमध्ये बूथ पातळीवर काम करणाऱ्यांनाच तिकिटे दिली जातील. नेत्यांसोबत पुढे-मागे धावणाऱ्यांना तिकिटे मिळणार नाहीत.तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी तिकिटांसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया रविवारपासूनच सुरू झाली आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांनी अर्जासोबत 50,000 ऊपये आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी 25,000 ऊपये अर्जासोबत डीडी स्वरुपात सादर करावेत. काँग्रेस पक्ष भवन बांधण्यासाठी आम्ही इच्छुकांकडून पैसे घेत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.