For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हादईचे पाणी वळविल्यास जैवविविधतेला गंभीर धोका

10:22 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
म्हादईचे पाणी वळविल्यास जैवविविधतेला गंभीर धोका
Advertisement

राज्य पर्यावरण अहवालातील माहिती : शेती-बागायती तसेच जमिनीच्या सुपिकतेला फटका बसणार

Advertisement

पणजी : म्हादई नदीचे पाणी वळवण्याचा कर्नाटक राज्याचा प्रस्ताव आणि प्रकल्प गोव्यातील पर्यावरण, जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणार असल्याची भीती राज्य पर्यावरण अहवाल - 2025 मधून वर्तवण्यात आली आहे. पाणी वळवले तर मांडवी नदीचे पाणी कमी होऊन ते अस्थिर होण्याची शक्यता अहवालातून नमूद केली आहे. मांडवी नदी पूर्णपणे म्हादई नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. म्हादईचे पाणी वळवले तर गोव्याकडे आणि प्रामुख्याने मांडवी नदीत येणारे पाणी कमी होणार आहे. ते पाणी कमी झाल्याने मोठे दुष्परिणाम गोव्याला सहन करावे लागणार असून त्याचा फटका गोव्यातील शेती-बागायती तसेच जमिनीच्या सुपिकतेला बसणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

गोव्यातील 43 टक्के लोकसंख्या अवलंबून

Advertisement

म्हादई-मांडवीतून येणाऱ्या पाण्यावर गोवा राज्यातील 43 टक्के लोकसंख्या अवलंबून आहे. म्हादईतून गोव्याकडे येणारे पाणी कमी झाले तर गोव्यात प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात जानेवारी ते मे या महिन्यात पाणी टंचाई निर्माण होणार असल्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे.

प्रस्तावित म्हादई वन्यजीवन अभयारण्यालाही धोका

म्हादई वन्यजीवन अभयारण्य त्या प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेपासून 300 मीटर्स अंतरावर असून पाणी कमी झाल्याने त्याचा परिणाम तेथील वन्यजीवनावर होणार आहे. पाणी कमी झाल्यास मांडवी किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप होण्याची शक्यता अहवालातून वर्तवण्यात आली आहे. पश्चिम घाट क्षेत्र व मासळी उत्पादनावरही त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असेही अहवालात म्हटले आहे. भगवान महावीर अभयारण्य, दुधसागर - सुर्ला धबधबा यांनाही कमी पाण्याचा फटका बसून त्यांचे सौंदर्य नष्ट होईल, अशी चिंता अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.