सहलीला गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगरच्या समुद्रात बुडून मृत्यू; कुटुंबीयांना मात्र मोठा धक्का; आळंदीत हळहळ
आळंदी | प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे समुद्रात बुडून आळंदीतील एका क्लासमधील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या सहलीत सहभागी असलेला शिव संतोष निचंग हा विद्यार्थी सुखरूप बचावला; मात्र त्याचे आठ जवळचे मित्र या दुर्घटनेत दगावल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिव हा आळंदीतील विनर ॲकॅडमीमध्ये अकरावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत आहे. गुरुवारी (1 ऑक्टोबर) पहाटे तीनच्या सुमारास तो क्लासमधील मित्रांसोबत कोकण सहलीसाठी रवाना झाला होता. त्याला मधुमेहाचा त्रास असल्याने नियमित औषधे आणि इन्सुलिन घेण्याची आवश्यकता असते. त्यामुळे त्याचे मित्र वेळेवर औषधे घेण्याची आठवण करून देत त्याची काळजी घेत होते.
दिवेआगर येथे पोहोचल्यानंतर काही वेळातच शिवच्या वडिलांना विद्यार्थ्यांच्या समुद्रात बुडाल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने शिवशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा मोबाइल बंद लागत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
दरम्यान, मृत विद्यार्थ्यांची नावे समोर येत असतानाच शिवचा फोन वडिलांना आला. ‘मी सुखरूप आहे; पण माझे मित्र बुडून गेले,’ असे सांगत शिवने फोनवरच रडत आपली व्यथा व्यक्त केली. मुलगा सुरक्षित असल्याचा दिलासा मिळाला असला तरी त्याच्या जिवलग मित्रांच्या मृत्यूने निचंग कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
शिवचे वडील संतोष निचंग यांनी सांगितले की, मुलाला मधुमेह असल्याने त्याच्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्याच्या मित्रांवर सोपवण्यात आली होती. हे सर्व विद्यार्थी आपल्या मुलासारखेच असल्याने त्यांच्या मृत्यूचे दुःख असह्य असल्याचे त्यांनी सांगितले.
घटनेची माहिती आळंदी आणि पंचक्रोशी परिसरात पोहोचताच पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली. अनेक पालकांनी क्लासच्या ठिकाणी धाव घेत आपल्या मुलांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेमुळे विद्यार्थी, पालक आणि परिसरावर शोककळा पसरली आहे.