एलपीजी सोडा पीएनजी गॅस जोडणी घ्या
नैसर्गिक गॅसच्या वापरासाठी मेगा गॅस कंपनीकडून नोटीस
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील ज्या भागात पीएनजी गॅस पाईपलाईन जोडण्यात आली आहे त्या भागातील दोन ते तीन हजार एलपीजी गॅस वापरकर्त्यांना मेगा सिटी गॅस कंपनीकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. पीएनजी गॅस असल्याने संबंधितांनी आपले एलपीजी कनेक्शन 90 दिवसांच्या आत खंडित करणे बंधनकारक आहे. तसेच ज्यांनी पीएनजी कनेक्शन घेतलेले नाही त्यांनी कनेक्शन घेणे अनिवार्य असणार आहे, अशी नोटीस मेगा गॅस कंपनीकडून बजावली जात आहे.
स्वयंपाकाच्या गॅस पुरवठ्यावरील ताण कमी करण्यासाठी शहरात 2018 मध्ये मेगा सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन प्रा. लि. कंपनीने पीएनजी प्रकल्प राबविला आहे. अंदाजे 70 हजार घरांना पीएनजी पुरविण्याचे उद्दिष्ट असून पहिल्या टप्प्यात शहराच्या हद्दीतील 35 हजारहून अधिक घरांना तसेच निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक इमारतींना पीएनजी जोडण्या आधीच दिल्या जात आहेत.
शहरातील महापालिकेच्या 35 ते 38 प्रभागांमध्ये पीएनजी गॅस लाईन आहे. आनंदनगर, नानावाडी, राणी चन्नम्मानगर, उद्यमबाग, मच्छे, संती बस्तवाड, वडगाव (पाच भाग), टिळकवाडी, भाग्यनगर, महांतेशनगर, रामतीर्थनगर, अंजनेयनगर, कुमारस्वामी ले-आऊट, हनुमाननगर (पाच भाग), टिळकवाडी, हिंडलगा, जयनगर, सह्याद्रीनगर, विद्यानगर, शिवबसवनगर, सिव्हील हॉस्पिटल आणि परिसरात पीएनजी गॅस लाईन आहे. तर काही ठिकाणी गॅस लाईन घालण्याचे काम सुरू आहे.
शहरातील ज्या भागांमध्ये पीएनजी गॅस लाईन जोडण्यात आली आहे तेथील दोन ते तीन हजार एलपीजी वापरकर्त्यांना कंपनीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वीच 1231 जणांना नोटीस देण्यात आली असून त्यांचे एलपीजी कनेक्शन 90 दिवसांच्या आत खंडित करणे बंधनकारक आहे. ज्यांच्याकडे पीएनजी कनेक्शन नाही त्यांना पीएनजी कनेक्शन घेणे अनिवार्य आहे, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यानंतर 90 दिवसांच्या आत वापरकर्त्याने कारवाई न केल्यास काही दिवसांतच एलपीजी कनेक्शन आपोआप खंडित केले जाणार आहे.
त्यामुळे पीएनजी भागातील रहिवाशांनी नोटीस मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करावी. ज्या भागातील काही घरांमध्ये पीएनजी बसवता येत नसल्याचे आढळल्यास त्यांनी मेगा गॅस कंपनीकडून नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळवून एलपीजी कनेक्शन पुन्हा सुरू करू शकतात. पीएनजी हे एक सुरक्षित, स्वच्छ आणि अत्यंत कार्यक्षम स्वयंपाकाचे इंधन आहे. त्याच्या वाढलेल्या वापरामुळे एलपीजी सिलिंडरच्या वाहतूक आणि वितरणाशी संबंधित लॉजिस्टिकवरील भार कमी होईल. तसेच यामुळे ग्राहकांना अधिक सोय मिळेल, हा यामागचा उद्देश आहे.