शत्रूंना अस्वस्थ करणारं...‘मिशन दिव्यास्त्र’ !
पाकिस्तान व खास करून चीनचा वाढता धोका लक्षात घेऊन भारत आपली अण्वस्त्र क्षमता वाढवत नेऊ लागला असून त्याचाच परिपाक म्हणजे ‘मिशन दिव्यास्त्र’...याअंतर्गत एकाच वेळी एकाहून जास्त लक्ष्यांवर अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांचा मारा करू शकणाऱ्या ‘अग्नी-5’ नि ‘अग्नी-प्राइम’ची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आलीय...
भारतानं हल्लीच घडविलंय सामर्थ्याचं अभूतपूर्व दर्शन...नवी दिल्लीनं ‘अग्नी-5’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं सर्वांत घातक स्वरुप जगाला दाखवून दिलंय...पहिल्यांदाच ‘अग्नी-5’ची ‘मल्टिपल-वॉरहेड्स’ क्षमता बंगालच्या उपसागरावरून झेपावताना दिसलीय...चीनचा विचार केल्यास देशाच्या ‘स्ट्रॅटेजिक डिटरन्स’ला मोठी चालना देणारी ही घटना. ‘अग्नी-5’ क्षेपणास्त्रात ताकद आहे ती तब्बल 5 हजार किलोमीटर्सचा पल्ला ओलांडून लक्ष्यावर घणाघाती आघात करण्याची. त्या क्षमतेला आता साहाय्य लाभेल ते ‘मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रि-एंट्री व्हेइकल’ म्हणजेच ‘एमआयआरव्ही’चं. थोडक्यात सांगायचं झाल्यास ‘मिशन दिव्यास्त्र’चा पाया घालण्यात आलाय...
‘अग्नी-5’ची त्रिस्तरीय चाचणी घेण्यात आलीय ती ओडिशाच्या किनारपट्टीवरील ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावर. क्षेपणास्त्र झेपावल्यानंतर विविध यंत्रणा व रडार्स स्टेशन यांनी त्याच्या प्रगतीचं सखोल विश्लेषण केलं...‘डीआरडीओ’नं ‘वॉरहेड्स’च्या संख्येसंबंधी काहीही जाहीर केलेलं नसलं, तरी अनधिकृत माहितीनुसार, आम्ही तीन ‘वॉरहेड्स’चा वापर केलाय. शिवाय ‘एमआयआरव्ही’ची ही पहिलीवहिली चाचणी असल्यानं ‘अग्नी-5’चा टप्पा 3500 किलोमीटर्स इतका कमी करण्यात आला होता...
क्षेपणास्त्रात स्वदेशी ‘अॅव्हिओनिक्स सिस्टम्स’चा अन् अचूक मारा करणाऱ्या ‘सेन्सर्स’चा वापर करण्यात आल्यानं त्याची घातकता जास्तच वाढलीय. विश्लेषकांच्या मतानुसार, ‘दिव्यास्त्र’च्या साहाय्यानं भारतानं तांत्रिक क्षेत्रातील दिवसेंदिवस करण्यात येणाऱ्या प्रगतीचं अगदी छान दर्शन विश्वाला घडविलंय...‘अग्नी-5’मुळं संपूर्ण चीन नि आशिया खंड तसंच युरोप आणि आफ्रिका खंडाचा मोठा भाग देखील आपल्या माऱ्याच्या टप्प्यात आलाय...
सध्या अमेरिका, ग्रेट ब्रिटन नि फ्रान्स ‘एमआयआरव्ही’ क्षेपणास्त्रांचा वापर पाणबुडीच्या साहाय्यानं करतात, तर चीन जमिनीवरून ती डागतो. रशिया या एकमेव देशाकडे जमीन तसंच समुद्रातून ‘एमआयआरव्ही’च्या साहाय्यानं हल्ला करण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे कंगाल पाकिस्ताननं सुद्धा ‘एमआयआरव्ही क्षेपणास्त्रं’ विकसित करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी त्यादृष्टीनं तयार केलेल्या ‘अबाबिल’ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी घेतली होती...
‘अग्नी प्राइम’ची भर...
- ‘अग्नी-5’नंतर लगेच चाचणी झाली ती ‘अग्नी प्राइम’ किंवा ‘अग्नी-पी’ या नवीन पिढीतील प्रगत अण्वस्त्रवाहू प्रकाराची...1 हजार ते 2 हजार किलोमीटर्सपर्यंत मारा करणारू शकणारं अन् दोन टप्पे असलेलं ते क्षेपणास्त्र...
- ‘अग्नी प्राइम’चं सर्वांत मोठं वैशिष्ट्या म्हणजे आधीच्या ‘अग्नी’ मालिकेच्या क्षेपणास्त्रांपेक्षा त्याचं वजन किमान 50 टक्के कमी अन् त्यात समावेश नवीन मार्गदर्शक तसंच ‘प्रोपल्जन’ व्यवस्थेचा...
- क्षेपणास्त्र ‘कॅनिस्टराइज्ड’ असल्यानं ते रस्त्यावरून आणि रेल्वेनं वाहून नेलं जाऊ शकतं आणि दीर्घ कालावधीसाठी तयार करून ठेवलं जाऊ शकतं. यामुळं डागण्यासाठी लागणारा वेळ व तयारी लक्षणीयरीत्या कमी होते...
‘एमआयआरव्ही’ म्हणजे काय ?...
- ‘एमआयआरव्ही पे-लोड’ म्हणजे एकाच क्षेपणास्त्रानं दोन ते तीन ‘वॉरहेड्स’च्या साहाय्यानं, वेगवेगळ्या गतीनं एकमेकांपासून शेकडो किलोमीटर्स अंतरावर असलेल्या लक्ष्यांवर केलेला हल्ला...
- यापूर्वी भारताच्या ‘ट्राय-सर्व्हिस स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड’च्या भात्यात असलेल्या ‘अग्नी’ मालिकेतील क्षेपणास्त्रांना शक्य होत असे ते एकाच ‘वॉरहेड’च्या साहाय्यानं हल्ला करणं...
- ‘डीआरडीओ’चे गेल्या कित्येक वर्षांपासून ‘एमआयआरव्ही’चं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अथक प्रयत्न चालू होते आणि शेवटी त्यांना यश मिळालंच...
- नवीन क्षेपणास्त्राचं सर्वांत मोठं वैशिष्ट्या म्हणजे शत्रूच्या ‘बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टम’ला चकवा देणं...
चीनला धास्ती...
- भारतानं ‘अग्नी-5’ आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यास काही आठवडे असताना चीननं त्यांची दुसरी हेरगिरी करणारी नौका भारतीय किनारपट्टीजवळ पाठविली होती. त्यांच्या त्यापूर्वी आलेल्या नौकेनं ताटाखालचं मांजर बनलेल्या मालदीवमध्ये तळ ठोकलाय...
- 4 हजार 425 टनांच्या ‘शियांग यांग वाँग 01’नं चिनी बंदर किंगडोह ते बंगालच्या उपसागरपर्यंतचा प्रवास केला. सध्या ही नौका विशाखापट्टणमच्या किनारपट्टीपासून 480 किलोमीटर्सवर आहे...
- भारतानं 7 मार्च या दिवशी ‘नोटीस फॉर एअर मिशन’ जारी करून शेजारी राष्ट्रांना 3550 किलोमीटर्सच्या क्षेत्रात पसरलेल्या हिंदी महासागरात होणाऱ्या चाचणीची कल्पना दिली होती...
‘तेजस मार्क-1 ए फायटर’ही सज्ज...
- भारताचं ‘लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस मार्क-1 ए’ची पहिली तुकडी सज्ज झालेली असून बेंगळूरमध्ये त्यातील एका विमानाचं पहिलंवहिलं उ•ाण देखील यशस्वीरीत्या पार पाडलंय...
- ‘तेजस मार्क-1 ए’ हे ‘मार्क एमके-1’चं आधुनिक रूप असून ‘मार्क-1’नं यापूर्वीच भारतीय हवाई दलात प्रवेश मिळविलाय...
- भारताच्या लढाऊ विमानांच्या ‘स्क्वॉड्रन्स’ 31 वर पोहोचलेल्या असून चीन व पाकिस्तानला एकाचवेळी तोंड देण्यासाठी आपल्याला गरज आहे ती 42 ‘स्क्वॉड्रन्स’ची...
- सार्वजनिक क्षेत्रातील ‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’नं (एचएएल) ‘तेजस एमके-1 ए’ची निर्मिती केलेली असून बेंगळूरच्या ‘डीआरडीओ’च्या ‘एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी’नं ते विकसित केलंय...
- ‘एचएएल’नं 8802 कोटी रुपयांची 32 ‘सिंगल सीट मार्क-1’ आणि दोन ‘मार्क-1’ ट्रेनर्सचा पुरवठा भारतीय हवाई दलाला केलाय. त्यात भर पडणार ती 83 ‘तेजस एमके-1 ए’ची...मार्च, 2024 ते फेब्रुवारी, 2028 या कालावधीत 46898 कोटी रुपयांची ही विमानं 2021 सालच्या करारानुसार हवाई दलाला द्यावी लागतील...
- उ•ाण केलेल्या तुकडीतील विमानं एप्रिल महिना संपण्यापूर्वी हवाई दलाला मिळतील. त्यापूर्वी त्यांना आणखी काही चाचण्यांना तोंड द्यावं लागेल...
भारताची आण्विक सज्जता (जमिनीवरून जमिनीवर मारा)...
- क्षेपणास्त्र पल्ला
- पृथ्वी-2 350 किलोमीटर्स
- अग्नी-1 700 किलोमीटर्स
- अग्नी-2 2000 किलोमीटर्स
- अग्नी-3 3000 किलोमीटर्स
- अग्नी-5 5000 किलोमीटर्सहून अधिक
हवेतील सामर्थ्य...
- ‘सुखोई-30 एमकेआय’, ‘मिराज 2000’, ‘जग्वार’ आणि ‘राफेल’ फायटर्समध्ये क्षमता आहे ती शत्रूंवर आण्विक हल्ला करण्याची....
समुद्रातील ताकद...
- सध्या भारताच्या भात्यात 6 हजार टनांची ‘आयएनएस अरिहंत’ ही एकमेव ‘न्युक्लिअर-पॉवरर्ड बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्रवाहू पाणबुडी असून तिच्यावर 750 किलोमीटर्स अंतर पार करणारं ‘के-15’ आण्विक क्षेपणास्त्र बसविण्यात आलंय...अजूनही काही चाचण्या शिल्लक राहिलेल्या असून ‘अरिहंत’ यंदाचं वर्ष संपण्यापूर्वी शत्रूच्या पोटात गोळा आणण्यासाठी सज्ज होईल...
- भारत 7 हजार टनांच्या ‘एस-4’ व ‘एस-4ए’ अशा आणखी दोन ‘न्युक्लिअर पॉवर्ड बॅलिस्टिक सबमरिन्स’ची विशाखापट्टणम इथं निर्मिती करत असून त्याचा पुढचा टप्पा हा 13 हजार टनांच्या ‘एस-5’ वर्गातील पाणबुडीचा...
- 3500 किलोमीटर्स पल्ल्याच्या ‘के-4’ क्षेपणास्त्राच्या विकास पक्रियेतील चाचण्या पूर्ण, तर 5 हजार किलोमीटर्सचं ‘के-5’ नि 6 हजार किलोमीटर्सचं ‘के-6’ ही क्षेपणास्त्रं विकसित करणं चालू...
आण्विक सज्जतेची गरज का ?...
आपण आण्विकदृष्ट्या सज्ज होणं का आवश्यक आहे हे शेजारी चीनवर नजर टाकल्यास कळून चुकेल...ड्रॅगन 12 हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम असलेल्या ‘डाँग फेंग-41’ या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासह आपली आण्विक क्षमता झपाट्यानं वाढवत चाललाय...त्यांच्या ताफ्यात सध्या समाविष्ट आहेत 500 पेक्षा जास्त आण्विक ‘वॉरहेड्स’. 2030 पर्यंत हे शस्त्रागार वाढवून एक हजारांपेक्षा जास्त ‘वॉरहेड्स’ पदरी बाळगण्याची बीजिंगची योजना आहे. उपग्रह प्रतिमांनी 300 हून अधिक नवीन क्षेपणास्त्र डागण्याच्या सुविधा उभारण्याचं काम त्यांनी हाती घेतलं असल्याचं दाखवून दिलंय. यामुळं त्याची आण्विक क्षमता आणखी वाढेल...
संकलन : राजू प्रभू