जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुका एप्रिल-मेमध्ये
राज्य निवडणूक आयुक्त संग्रेशी यांची सूचना
बेळगाव : बहुप्रतीक्षेत असलेल्या जिल्हा पंचायत,तालुका पंचायत निवडणुका येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात घेण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात येणार असून संबंधित विभागांना आरक्षणाच्या याद्या देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संग्रेशी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. वॉर्ड पुनर्रचनेसह काही तांत्रिक कारणामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर जि. पं., ता. पं. निवडणुका घेतल्या जाणार आहेत. निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी तहसीलदारांना तालुक्यातील गावांना भेटी देऊन चर्चा करून निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे जि. पं. ता. पं. निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची तयारी चालविली आहे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नोंदणी केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगामार्फत राज्यघटना आणि लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका घेतल्या जाणार आहेत, असे संग्रेशी यांनी सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार व्हनकेरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.