जि. पं. कार्यकारी अधिकारी राहूल शिंदेंकडून खानापूर तालुक्यातील ग्रा. पं.च्या कामांची पाहणी
खानापूर : जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी बुधवारी तालुक्यातील नंदगड, बिडी, नागरगाळी या ग्राम पंचायतींना भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. नंदगड येथे सुरू असलेल्या बहुग्राम पेयजल प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. तसेच नंदगड येथील डॅममधील जलसाठ्याची पाहणी केली. तसेच डॅमच्या दुरुस्तीच्या प्रकल्पाच्या आराखड्याची माहिती घेतली. तसेच राहूल शिंदे यांनी नंदगड ग्राम पंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन युनिटची पाहणी करून याबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर राहूल शिंदे यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह बिडी ग्राम पंचायत कार्यालयास भेट देऊन करवसुली, मनरेगा योजनेसह विविध योजनांच्या विकासकामांची माहिती घेतली.
मनरेगा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विकासकामांबाबत त्यांनी अधिकारी आणि ग्रा. पं. सदस्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले. बिडी ग्रा. पं. मधील डिजिटल लायब्ररीबाबत त्यांनी कौतुक केले. यानंतर लिंगनमठ येथील बहुग्राम पाणी योजनेची पाहणी केली. त्यानंतर नागरगाळी ग्रा. पं. अंतर्गत बामणकोप्प गावात मनरेगा प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या तलावातील गाळ काढण्याच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. तसेच मजुरांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी दिनेशकुमार मीना, ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता रमेश मेत्री, पंचायत राज अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता राजेंद्र जाधव, क्षेत्र शिक्षणाधिकारी ए. आर. अंबगी, ता. पं. सहाय्यक संचालिका रुपाली बडकुंद्री, विजया कोथिन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.