जिल्हा पंचायत सीईओंची कार जप्त
बेळगाव : भूसंपादन करून 6 वर्षांचा कालावधी लोटला तरी भरपाई न दिल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची सरकारी कार जप्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनीची 90 लाख रुपयांची नुकसानभरपाई वेळेत न दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. कित्तूर तालुक्यातील कुलवळ्ळी गावातील शेतकऱ्यांकडून 21 एकर जमीन विविध सरकारी कामांसाठी संपादित करून कुलवळ्ळीचे कात्रदड्डी गावात रुपांतर करण्यात आले. येथे सरकारी कार्यालये, पशुसंवर्धन हॉस्पिटल, शाळा निर्माण करण्यात आली असून मूलभूत सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत.
मात्र हे करत असताना ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे, त्यांना अद्याप भरपाई देण्यात आलेली नाही. यानंतर जमीन मालकांनी न्यायालयात धाव घेतली असता प्रतिएकर 37 हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र ही भरपाई कमी असल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. तेव्हा न्यायालयाने प्रतिएकर 4 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयाने जप्तीची कारवाई करण्याचा आदेश दिला होता. याला 6 वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्याप शेतकरी भरपाईपासून वंचित होते. न्यायालयाच्या आदेशानुसार जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची सरकारी कार जप्त करण्यात आली आहे.