कलखांब-मुचंडी ग्रा.पं.ना जि. पं. सीईओंची भेट
नरेगाअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची केली पाहणी : अधिकाऱ्यांना केल्या सूचना
बेळगाव : जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी बुधवारी कलखांब-मुचंडी ग्राम पंचायतींना भेट देऊन नरेगाअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. दरम्यान ही विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. कलखांब ग्राम पंचायतीमध्ये स्वत: सीईओंनी ई अॅसेट अकाउंटची वेबसाईट उघडून यामध्ये लॉग इन आणि इतर कागदपत्रासाठी किती वेळ लागतो, याची चाचपणी केली. शिवाय ग्राम पंचायतीमधून राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. दरम्यान ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेत हजर राहून जनतेची कामे सुरळीत करावीत, अशा सूचना केल्या. 2023-24 या वर्षात कलखांब गावामध्ये 40 लाख अनुदानातून रस्ते, सीडीवर्क, ड्रेनेज, पेव्हर्स आदी विकासकामे राबविली आहेत. या कामांची पाहणी करून ती तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचनाही करण्यात आल्या. तसेच विश्वेश्वरय्या नगर येथे बागायत खात्यासाठी उभारण्यात येत असलेल्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अधिकारी सुंदर कोळी, बी. एम. बन्नूर, पीडीओ गोपाळ गुडसी यांच्यासह तांत्रिक साहाय्यक व ग्रा. पं. कर्मचारी उपस्थित होते.