जिल्हास्तरावरील शिक्षक बदली कौन्सिलिंग पूर्ण
आता विभागीय स्तरावरील कौन्सिलिंगकडे लक्ष
बेळगाव : शिक्षक बदली कौन्सिलिंग प्रक्रिया अखेर बुधवारी पूर्ण झाली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील प्राथमिक,माध्यमिक तसेच सीआरपी कौन्सिलिंग करण्यात आले. त्यानंतर आता शिक्षकांना विभागीय स्तरावरील कौन्सिलिंगची प्रतीक्षा आहे. ज्या शिक्षकांना जिल्हास्तरीय कौन्सिलिंगमध्ये योग्य संधी मिळाली नाही. त्यांना आता विभागीय स्तरावर संधी दिली जाणार आहे. मागील अनेक दिवसांपासून रखडलेली शिक्षक बदली कौन्सिलिंग प्रक्रिया अखेर सुरु करण्यात आली होती. मराठा मंडळाच्या जिजामाता हायस्कूलमध्ये 4 नोव्हेंबरपासून कौन्सिलिंग सुरु झाले. पहिल्या तीन दिवसांमध्ये प्राथमिक विभागाचे कौन्सिलिंग पूर्ण झाले.
पहिल्या दिवशी मुख्याध्यापक व त्यानंतर सहाय्यक शिक्षकांना संधी देण्यात आली. शैक्षणिक जिल्ह्यातील 1689 शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला. प्राथमिक विभागानंतर हायस्कूल विभागाचे कौन्सिलिंग झाले. मागील दोन दिवसांत सीआरपी पदासाठी कौन्सिलिंग घेण्यात आले. बुधवार दि. 12 रोजी जिल्हास्तरीय कौन्सिलिंग प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये अनेक शिक्षकांना बदली देण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्हास्तरीय बदली कौन्सिलिंगनंतर आता विभागीय स्तरावर कौन्सिलिंग होणार आहे. ज्या शिक्षकांनी जिल्हास्तरीय कौन्सिलिंगमध्ये बदली नाकारली त्यांना विभागीय स्तरावर संधी दिली जाणार आहे. त्यानंतर राज्य स्तरावरील कौन्सिलिंग होणार आहे. त्यामुळे आता शिक्षकांच्या नजरा विभागीय स्तरावरील कौन्सिलिंगकडे लागल्या आहेत.