कृषी खात्याकडून जिल्हा पाहणी दौरा
शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन : पिकांच्या खतासह विविध औषध फवारणीबाबत देणार माहिती
बेळगाव : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. परिणामी पेरणी केलेली पिके वाया जाण्याची शक्यता असून, कृषी खात्याने जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पाहणी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात कृषी अधिकाऱ्यांकडून पिकांची माहिती घेऊन पिके सुरक्षित राहण्यासाठी कोणती औषधे व खते द्यावीत, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी केले आहे.
मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अद्याप काही ठिकाणी शेतीशिवारात पाणी असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी पेरणी केलेले पीकच उगवले नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. दरम्यान, जिल्हा कृषी खात्याने याची दखल घेऊन अधिकाऱ्यांच्या पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाद्वारे जिल्ह्यात पाहणी दौरा करून शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यात येणार असून, पिकांच्या संवर्धनासाठी उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे.
पाऊस होऊनही काही ठिकाणी अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. पण काही ठिकाणी पिकांचे नुकसान होत आहे. सोयाबीन, मसूर, कापूस, चवळी, ऊस आदी पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी कृषी खात्याकडून पाहणी दौरा सुरू करण्यात आला असून शेतकऱ्यांना नुकसानीच्या छायेखाली असणाऱ्या पिकांना कोणत्या औषधांची फवारणी करावी व कोणती खते पुरवावीत, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.