जिल्हा उपनिबंधक, अधीक्षक यांना न्यायालयीन कोठडी
लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने पकडले होते रंगेहाथ
प्रतिनिधी / ओरोस
लाच स्वीकारताना पकडलेल्या जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे आणि कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांना जिल्हा न्यायाधीश १ अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. दोन्ही संशयित आरोपींच्या वतीने ॲड. अजित भणगे आणि ॲड. मिहिर भणगे, ॲड. सुनील मालवणकर, ॲड. आशुतोष कुलकर्णी यांनी काम पाहिले.
श्री. स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्था मर्यादीत, रेवतळे, मालवण, जि. सिंधुदुर्ग या गृहनिर्माण संस्थेच्या मानीव अभिहस्तांतरण आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करुन जमीन संस्थेच्या नावे करण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती ३३ हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही मंगळवारी रंगेहाथ पकडले होते. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाच्या वतीने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे .