जिल्हाधिकाऱ्यांची राजहंसगडाला भेट
स्थानिकांनी मांडलेल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन
बेळगाव : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ऐतिहासिक राजहंसगडाला भेट देऊन गडाची पाहणी केली. शनिवारी सहकुटुंब ते गडावर दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा व गडाची तटबंदी पाहिली. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच ते गडावर आले होते. त्यामुळे स्थानिक तरुणांनी त्यांचे स्वागत केले. गडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरात देवदर्शन घेऊन भव्य शिवपुतळ्याचेही त्यांनी दर्शन घेतले. यावेळी स्थानिक तरुणांसमवेत शिवपुतळ्यासमोर त्यांनी छायाचित्रे घेतली. त्यानंतर संपूर्ण गडाची पाहणी केली. राजहंसगड येथील युवकांनी परिसरातील समस्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. गडावर पार्किंगची सोय करण्याबरोबरच पाण्याची समस्या सोडविण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी भाऊराव पवार, जोतिबा थोरवत, पिंटू कुंडेकर, गौतम थोरवत, मोनेश्री थोरवत, रेणुका थोरवत, तलाठी मयुर मासेकर, साहाय्यक यमुना यादव आदी उपस्थित होते.