लोळसूर पुलाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
पुलावर पाणी आल्याने जाणून घेतल्या समस्या
बेळगाव : पावसामुळे गोकाकजवळील लोळसूर पूल पाण्याखाली गेला असून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी गोकाकला भेट देऊन पाहणी केली. पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या पुलांचे सर्वेक्षण करून नवे पूल उभारण्यासाठी सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. याबरोबरच नदीकाठावरील पूरस्थिती लक्षात घेऊन तेथील नागरिकांची सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. कोयना व पंचगंगा नदीतून पाण्याचा स्रोत वाढला आहे. कृष्णा नदीला 1 लाख 48 हजार क्युसेक्स पाणी आले आहे. हिप्परगी जलाशयाच्या माध्यमातून 1 लाख 12 हजार क्युसेक्स पाणी आलमट्टीकडे जाणार आहे. यासंबंधीची माहिती मुख्य अभियंत्यांना देण्यात आली आहे. हिडकल जलाशयातून 36 हजार क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. नदीकाठावरील शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याची सूचना केली आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पाण्याखाली गेलेल्या लोळसूर पुलावरून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यासंबंधी तहसीलदारांकडून पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून नागरिकांना सूचना देण्यात आली आहे. बुधवारी थोड्या प्रमाणात पाऊस ओसरला असला तरी आणखी दोन दिवस खबरदारी म्हणून रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. नदीपात्रावरील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन करतानाच पावसामुळे घर कोसळून मृत्युमुखी पडलेल्या गोकाक येथील महिलेच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची सूचना करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पुराची स्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यात एसडीआरएफ व एनडीआरएफच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांसाठी निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांना भेटी देऊन आपण तेथील व्यवस्थेची पाहणी केली आहे. लोळसूर पुलामुळे गोकाक येथील सुमारे 200 घरातील रहिवाशांना फटका बसला आहे. कृष्णा नदीतून दीड लाख क्युसेक्सची पातळी ओलांडल्यानंतर पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. निपाणी, चिकोडी, कागवाड, अथणी परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यात 550 निवारा केंद्रे तयार ठेवण्यात आली आहेत. यापैकी सध्या 63 केंद्रांची गरज भासणार आहे. सध्या गोकाक व निपाणी येथे दोन केंद्रे सुरू करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अभिनव जैन, तहसीलदार मोहन भस्मे, नोडल अधिकारी बसवराज कुरीहुली, तालुका आरोग्याधिकारी मुत्तण्णा कोप्पद यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
कृष्णा, दूधगंगेच्या पातळीत वाढ; अलमट्टीतील विसर्गही वाढविला
गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे अंकली-मांजरी येथील कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये साडेचार मीटरने तर सदलगा येथील दूधगंगा नदीची पाणीपातळी 3.200 मीटरने वाढली आहे. याचबरोबर हिप्परगीनजीक कृष्णेची पातळी 1.77 मीटरने वाढली आहे. बुधवारी सायंकाळपासून पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढल्याने अलमट्टीतील विसर्गही वाढविण्यात आला आहे. बुधवारी दिवसभरात पावसाची उघडझाप असली तरी पाणीपातळीत मात्र वाढ सुरूच आहे. संततधार पावसामुळे चिकोडी तालुक्यातील मलिकवाड-दत्तवाड बंधारा तसेच कल्लोळ-येडूर दरम्यान असलेल्या कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर पाणी आल्याने दोन्ही बंधारे वाहतुकीस बंद आहेत. याचबरोबर सदलगा-बोरगाव वाहतूकही बंद झाला आहे. परिणामी, या भागातील नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे. राजापूर येथे कृष्णा नदीमध्ये 87,500 तर दूधगंगा नदीतून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात 26 हजार 832 क्युसेक्सनी वाढ झाली आहे. कृष्णेच्या पात्रात येणाऱ्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे.