For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आरोग्य आढावा बैठक

10:07 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आरोग्य आढावा बैठक
Advertisement

चीनमधील अनारोग्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी : आवश्यक तयारी करण्याची सूचना

Advertisement

बेळगाव : कोरोनानंतर चीनमध्ये नव्याने निर्माण झालेल्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक तयारी करण्याची सूचना केली आहे. आयएलआय (इन्फ्लुएंझा लाईट इलनेस) न्युमोनिया, सारी, डेंग्यू, कावीळ आदी कोणत्याही आजाराने त्रस्त रुग्ण उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा समुदाय आरोग्य केंद्रात दाखल झाल्यास अशा रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक तयारी करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली असून व्हायरल न्युमोनियाची प्रकरणे दिसून आल्यास तातडीने उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. बिम्स व इतर आरटीपीसीआर तपासणी केंद्रे कार्यरत ठेवण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी व तातडीच्या उपचारांसाठी ऑक्सिजन, औषधे, स्वतंत्र खोल्या तयार ठेवाव्यात, असा सल्ला आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला असून इन्फ्लुएंझा, व्हायरल न्युमोनिया, कावीळ, डेंग्यूसह कोणत्याही रोगांचा फैलाव रोखण्यासाठी सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात खबरदारी घ्यावी. डॉक्टरांसह आरोग्य खात्यात रिक्त पदे भरून घेण्यात यावीत, अशी सूचना जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना करण्यात आली. पुढील आठवड्यात सुवर्ण विधानसौधमध्ये होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन कर्तव्यासाठी नियुक्त केलेले आरोग्य खात्याचे अधिकारी, कर्मचारी, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकाऱ्यांनी चीनमध्ये अलीकडे दिसून आलेल्या व्हायरसच्या धर्तीवर न्युमोनियाची प्रकरणे आढळून आल्यास त्यावर उपचारासाठी तयारी करण्यात येत असल्याचे सांगितले. बैठकीत जिल्हा सर्वेक्षणाधिकारी डॉ. संजय दोडमनी, जिल्हा कुष्ठरोग नियंत्रणाधिकारी गीता कांबळे, क्षयरोग नियंत्रणाधिकारी डॉ. चांदनी देवडी, चिकोडीचे अप्पर जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. एस. गडेद आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.