पिक कर्ज व वसुलीत जिल्हा बँक राज्यात आघाडीवर
सातारा :
जिह्याच्या कृषी व ग्रामीण विकासासाठी कटीबद्ध असणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्राहकांना 319 शाखा व 962 विकास सेवा संस्था, 65 एटीएम, 650 मायक्रो एटीएम, 11 विभागीय कार्यालय, 11 साक्षरता केंद्र व एटीएम मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून जिह्यातील ग्रामीण व शहरी ग्राहकांना बँकिंग सुविधा पुरविणेचे निरंतर कार्य करीत आहे. ग्रामीण विकासाबरोबरच कृषी औद्योगिकरणाचे धोरण गतीमान करण्यासाठी बँकेने विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. कृषि व कृषिपूरक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी सभासदांचे आर्थिक उत्पन्न वाढवून त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी बँक नेहमीच प्रयत्नशील असते. बँकेने आपली वसुलीची परंपरा कायम राखत यावर्षीही शेती कर्जाची विक्रमी 97.89 टक्के वसुली करून राज्यात आदर्श विक्रम प्रस्थापित केला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांनी दिली.
बँकेच्या संचालक मंडळाने शेती कर्जाच्या वसुलीसाठी केलेल्या आवाहनास तसेच विकास सेवा संस्था पंचकमिटी, सचिव व बँकेच्या वसुली यंत्रणेच्या विनंतीस प्रतिसाद देवून बँकेशी बांधिलकी असलेल्या या जिह्यातील शेतकरी वर्गाने प्रामाणिकपणे शेती कर्जाची वेळेत परतफेड केली आहे. याचाच परिणाम म्हणून बँकेने आपली वसुलीची परंपरा कायम राखत यावर्षीही शेती कर्जाची विक्रमी 97.89 टक्के वसुली करून राज्यात आदर्श विक्रम प्रस्थापित केला आहे.
या प्रसंगी चेअरमन खा. नितीन पाटील म्हणाले, बँकेने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्याचा सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. दुष्काळ, पूर परिस्थिती, कोरोना सारखे साथीचे रोग अशा अडचणीच्या परिस्थितीत सातारा जिल्हा बँकेने सढळ हाताने मदत केलेली असून वसुली प्रोत्साहनासाठी व्याज परतावा योजना राबविणारी एकमेव बँक म्हणून सातारा जिल्हा बँकेचा उल्लेख केला जातो. नियमित व वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज परतावा मिळत असलेने शेतकऱ्यांना पिक कर्जाबरोबरच शैक्षणिक कर्जही ‘शून्य‘ व्याजदराने मिळत आहे. त्याचप्रमाणे बँकेने मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जावरील व्याजाचा परतावाही वेळोवेळी दिलेला आहे. विकास सेवा सोसायट्यांनाही वसुली प्रोत्साहन रक्कम दरवर्षी दिली जाते. तेव्हा, शेतकऱ्यांनी कर्जाची नियमित परतफेड करून बँकेच्या व्याज परताव्याचा लाभ घेण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष नितिन (काका) पाटील यांनी केले आहे.
जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात सन 2023-24 करिता जिह्याचे एकूण पिक कर्ज वाटप उद्दिष्ठ रु. 2800/- कोटी पैकी सातारा जिल्हा बँकेस 61 टक्के म्हणजे रु. 1712 कोटी उद्दिष्ठ दिलेले आहे. त्यामध्ये खरीप पिकासाठी रु. 1258/- कोटी व रब्बी पिकासाठी रु. 454/- कोटी असे उद्दिष्ठ आहे. बँकेने खरीप हंगामाची पूर्तता करणेपोटी 14/03/2023 अखेर रु. 1224/- कोटी इतके पिक कर्ज वाटप केले आहे. खरीप उद्दिष्टाची 97 टक्के पूर्तता झाली असून रब्बी पिकाचे 510 कोटी इतके कर्ज वाटप झाले आहे. एकूण पूर्तता 1734/- कोटी झाले असून 102 टक्के पूर्तता झाली आहे. उद्दिष्टांहून अधिक वाटप करून जिह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे.
चालू वसुली हंगामात पिक कर्ज वसुलीसाठी सहकार्य केल्याबद्दल जिह्यातील सर्व शेतकऱ्यांचे तसेच सर्व विकास सेवा संस्थांचे चेअरमन, पंचकमिटी सदस्य व सचिव यांचे बँकेच्यावतीने आभार व्यक्त केले आहेत.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष नितिन (काका) पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई व सर्व संचालक मंडळ तसेच बँकेचे मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी जिह्यातील सर्व शेतकरी सभासदांना बँकेच्या सर्व कर्ज योजना व सुविधांचा लाभ घेणेचे आवाहन केले.