शताब्दी वर्षात जिल्हा बँक राज्यात नंबर वन होणार!
सांगली :
सांगली जिल्हा बँकेची वाटचाल शून्य एनपीएच्या दिशेने आहे. बड्या थकबाकीदार संस्थांकडील वसुलीचा आराखडा तयार केला आहे. बँकेचे 2026 पासून शताब्दी वर्ष सुरू होणार असून या कार्यकाळात बँक राज्यात नंबर नेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार बैठकीत दिली. आगामी दोन वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक ताकद देण्यात येणार असल्याचेही नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी स्पष्ट केले.
जिल्ह बँक 2026 च्या मार्च महिन्यात शंभराव्या वर्षात पदार्पण करणार आहे. बँकेच्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये बँकेने गरूड भरारी घेतल्याचे सांगून नाईक म्हणाले, बँक 98 वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांसह इतर घटकांच्या पाठीशी राहिली. आता बँकेची शताब्दी वर्षाकडे वाटचाल सुरू आहे.या वर्षात शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजासह, त्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जे, बचतगटांना आर्थिक मदत केली आहे. शेतकऱ्यांनी बँकेवर विश्वास ठेवल्याने आज बँकेच्या तीन वर्षात दोन हजार कोटीवर ठेवी वाढल्या. आगामी दोन वर्षात दहा हजार कोटींवर ठेवी होतील.
भागभांडवलामध्येही 29 कोटींची वाढ झाली आहे. तीन वर्षात बँकेच्या प्रगतीचा आलेख वाढताच आहे असे सांगून नाईक म्हणाले, आगामी दोन वर्षात बँक राज्यात नंबर वन वर राहिल. यासाठी बँकेने आतापासूनच आराखडा तयार केला आहे. आज बँकेचा ग्रॉस एनपीए 7.53 टक्के आहे. तो दोन वर्षात शुन्य टक्के करण्याचा प्रयत्न आहे. सध्या नेट एनपीए शून्य टक्के आहे. शेती कर्जाचा एनपीए फक्त 45 कोटी राहिला आहे. मात्र बडया संस्थांकडील यासाठी जुन्या आणि बडया थकबाकीदार संस्थांकडील थकबाकीमुळे बँकेचा ग्रॉस एनपीए दिसून येत असून या वसुलीसाठीचा आराखडा तयार केला आहे.
- दुष्काळी भागासाठी ओटीएस
सध्या दुष्काळी भागातील शेतकऱ्याकंडे कर्ज थकीत आहेत. ही वसुली व्हावी यासाठी शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंट योजना राबविण्याचा विचार आहे. याबाबतची मागणी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात आल्याचे सांगून नाईक म्हणाले, याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. थकबाकीमध्ये असलेल्या संस्थांसाठीही सवलतीच्या योजना आणून या संस्थाही थकबाकीतून बाहेर काढल्या जातील. बँकेने शेतकऱ्यासाठी विमा योजना राबविला आहे. बँकेने भरलेल्या हप्त्याच्या रक्कमेपेक्षा अधिक फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. आणखी दोन वर्षे ही योजना असून अनेक शेतकऱ्यांना लाभ होईल.
- सीबीजीसाठी कारखान्यांना कर्जपुरवठा
केंद्र सरकारने कारखान्यांसाठी सीबीजी गॅस निर्मीती करण्यासाठी 40 टक्के अनुदान देण्याची योजना आणली आहे. हे प्रकल्प उभारण्यासाठी जिल्ह्यातील राजारामबापू, विश्वास, क्रांती, सोनहिरा यासह आदी कारखान्यांनी पुढाकार घेतला आहे,. सध्या बँकेकडे ठेवींचा ओढा वाढत आहे. यासाठी बँकेने कारखान्यांना या प्रकल्पासाटी कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष नाईक यांनी सांगितले.
- पशुपालकांसाठी तीन लाखापर्यतचे कर्ज
शेतकऱ्यांना पशुपालनापासून चांगली मदत होत आहे. या माध्dयामातून आणखी हातभार व्हावा यासाठी बँकेने पशुपालकांना खेळते भांडवल मिळावे यासाठी तीन लाखापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नियमित कर्ज भरणाऱ्या कर्जदारांसाठी कर्ज वाटपाचे नवे धोरण आखले जाणार आहे. बचतगटानी तयार केलेल्या मालासाठी बाजारपेठ मिळवून देण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे अध्dयाक्ष नाईक यांनी सांगितले.