For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

11:17 AM Jun 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
Advertisement

मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या दि. 4 रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. सुरक्षाव्यवस्था, निवडणूक कर्मचारी आदी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात 144 कलम जारी करण्यात येणार आहे. कोणतीच अनुचित घटना घडू नये यासाठी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी आरपीडी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रावर भेट देऊन पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बेळगाव मतदारसंघाच्या व्याप्तीत आठ विधानसभा मतदारसंघ येतात. सदर मतदारसंघातील मतदान यंत्रे आरपीडी महाविद्यालयाच्या स्ट्राँगरुममध्ये ठेवली आहेत.

यासाठी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. दि. 4 रोजी  मतमोजणी करण्यात येणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून निवडणूक यंत्रणा सज्ज असणार आहे. 6 वाजता स्ट्राँगरुम खोलण्यात येतील. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, निवडणूक विभागाचे पर्यवेक्षक यांच्या समक्ष ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ केला जाणार आहे. 20 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये 19 लाख 23 हजार 788 मतदार असून 13 लाख 75 हजार 283 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदारसंघात 71.49 टक्के मतदान झाले आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघामध्येही आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था व मतमोजणीसाठीची तयारी करण्यात आली आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सदर प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून सोमवार दि. 3 रोजी शेवटचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. मतमोजणी दरम्यान कोणतीच अनुचित घटना घडू नये, यासाठी मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. मतमोजणी केंद्राच्या परिसरात फटाके अथवा गुलाल उधळण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. मोबाईल, तंबाखू, सिगारेट, विडी, पान यावरही निर्बंध घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

मतमोजणी केंद्रावर 552 कर्मचारी

बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर 552 निवडणूक विभागाचे कर्मचारी असणार आहेत. यामध्ये पर्यवेक्षक, मायक्रो ऑर्ब्झरव्हर व मतमोजणी कर्मचारी यांचा सहभाग आहे. मतदान यंत्रांच्या माध्यमातून मतमोजणी प्रक्रिया त्वरित गतीने पूर्ण करणे शक्य आहे. मात्र, पोस्टलद्वारे आलेल्या मतांची मोजणी करण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. पोस्टल बॅलेट मतमोजणीसाठी स्वतंत्र दोन कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 11,148 पोस्टल मतदान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. पोस्टल मतदान मोजणीसाठी निवडणूक विभागाच्या 72 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.