भारत-चीन सैन्यमाघारीनंतर आज सीमेवर मिठाईवाटप
गस्तीबाबत कमांडरस्तरीय चर्चा लवकरच ; दोन्ही देशाचे सैन्य आता पूर्वीच्या स्थितीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, लडाख
भारत-चीन सीमेवरील देपसांग आणि डेमचोक येथून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा बुधवारी अधिकृतपणे करण्यात आली. आता गुऊवारी दिवाळीच्या दिवशी चीन आणि भारताचे सैनिक एकमेकांना मिठाईचे वाटप करणार आहेत. तसेच सीमारेषेवरील गस्तीबाबत लवकरच ग्राऊंड कमांडरच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. ग्राउंड कमांडरमध्ये ब्रिगेडियर आणि त्याहून कनिष्ठ दर्जाचे अधिकारी समाविष्ट असणार आहेत.
लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 आणि 29 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही देशांनी देपसांग आणि डेमचोकमधून आपले सैन्य पूर्णपणे मागे घेतले आहे. आता गस्तीसाठी मर्यादित सैनिकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. हा आकडा कोणता आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. ‘एलएसी’वर गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात झालेल्या करारावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सैन्य मागे घेणे ही पहिली पायरी असल्याचे सांगितले होते. आता पुढील पायरी म्हणजे तणाव कमी करण्यावर दोन्ही देशांचा भर राहणार आहे. तणाव कमी झाल्यानंतर सीमेचे व्यवस्थापन कसे करायचे यावर चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले.
दोन्ही बाजूंची माघार
भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्याने शारीरिकदृष्ट्या आणि ड्रोनद्वारे या भागात त्यांची उपस्थिती संपल्यानंतर तात्पुरती बांधकामे हटविल्याचीही खात्री केली आहे. देपसांग मैदान आणि डेमचोक येथील तात्पुरते बांधकाम (तंबू) हटविण्याचे कामही पूर्ण झाले आहे. यासोबतच दोन्ही पक्षांकडून विहित स्तरावर पडताळणी करण्यात आली आहे. या प्रक्रियेंतर्गत तेथे तैनात असलेल्या दोन्ही सैन्याने त्यांच्या नेमलेल्या ठिकाणी माघार घेतली आहे. आता 10 ते 15 सैनिकांची तुकडी येथे गस्त घालणार असून एप्रिल 2020 पूर्वीची परिस्थिती पूर्वपदावर येईल.
माघारीची प्रक्रिया
पूर्व लडाखमधील सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये चार वर्षांपासून तणाव होता. दोन वर्षांच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर नुकताच एक करार झाला आहे. देपसांग आणि डेमचोक या वादग्रस्त बिंदूंवरून दोन्ही सैन्याने माघार घेतली आहे. भारत आणि चीनच्या सैन्याने शुक्रवार, 25 ऑक्टोबरपासून पूर्व लडाख सीमेवरून माघार घ्यायला सुऊवात केली होती. दोन्ही सैन्याने डेमचोक आणि देपसांग पॉइंट येथील तात्पुरते तंबू आणि शेड हटवले. चिलखती वाहने आणि लष्करी उपकरणेही मागे घेण्यात आली. पहिल्या दिवशी 40 ते 50 टक्के प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाले. त्यानंतर देपसांग व डेमचोक बुधवारी पूर्णपणे रिक्त झाले आहे.