शिक्षण मंडळ कराडच्या पुरस्काराचे 8 रोजी वितरण
कराड :
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिक्षण मंडळ, कराडतर्फे व कै. श्रीमती कमलाबेन वाडीलाल शाह यांच्या स्मरणार्थ जागतिक महिला दिन समारंभ व आदर्श माता व मानिनी पुरस्कारांचे वितरण साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर यांच्या हस्ते शनिवार ८ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता स्व. शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला सभागृह, मंगळवार पेठ, कराड येथे होणार आहे.
डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड, सातारा येथे तीन वेळा जिल्हा न्यायाधिशांकडून त्यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली असून या संस्थानच्या रघुवीर समर्थ मासिकाच्या कार्यकारी संपादिका म्हणून त्या कार्यरत आहेत. अनेक सुप्रसिद्ध मासिके व वर्तमानपत्रातून त्यांचे साहित्य प्रसृत झालेले आहे. सातारा आकाशवाणीवरून त्यांचे आत्तापर्यंत दोनशेपेक्षा अधिक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.
याप्रसंगी पार्वती नारायण चिंगळे यांना आदर्श माता पुरस्कर तर राजश्री रवळनाथ शेंडे यांना मानिनी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अत्यंत खडतर परिस्थितीशी लढा देऊन पार्वती नारायण चिंगळे यांनी कौटुंबिक स्थैर्य प्राप्त केले. मुलांना शिक्षित बनवण्यासाठी प्रसंगी दुसऱ्याची शेती कसण्यासाठी घेतली. खेडोपाडी जाऊन मसाल्याचा व किराणा मालाचा व्यापार केला, मुलीला शिक्षिका बनवले, मोठ्या मुलाला व्यवसायात पारंगत केले, धाकट्या मुलाला पदवीधर बनवले. आज कराडमध्ये चिंगळे बंधूंनी एक नामांकित व्यापारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या सर्व यशामागे पार्वती नारायण चिंगळे यांचे मोठे योगदान आहे.
राजश्री रवळनाथ शेंडे यांनी उच्च शैक्षणिक पदवी संपादित करून प्रारंभी कराडच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्राध्यापक व विभागप्रमुख पदाचा कार्यभार संभाळला. पती रवळनाथ शेंडे यांचा श्री रेफ्रिजरेशन्स लिमिटेड हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा उद्योग ओगलेवाडी येथे आहे. या फर्ममध्ये त्यांचे सन २०१३ पासून योगदान असून सध्या त्या फर्मच्या कार्यकारी संचालक पदावर त्या कार्यरत आहेत. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर यांचे 'स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
शिक्षण मंडळ, कराडने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षण मंडळ, कराडचे अध्यक्ष डॉ अनिल डुद्देदार, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.