412 नोंदीत बांधकाम कामगारांना वेंगुर्ल्यात गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप
सचिन वालावलकर व दिलीप गिरप यांच्या हस्ते भांडी संचाचे वाटप
वेंगुर्ले (वार्ताहर)-
खरतर कामगारांमुळे उद्योगधंदे चालतात. साध्या घरापासून ते मोठमोठ्या बिल्डींग घडविण्यासाठी शारीरिक श्रमाचे काम पुरूष व महिला कामगार करतात. त्यामुळे नागरिक त्याचा लाभ घेऊ शकतात. तसेच व्यावसायिक आपला व्यवसाय करतात. तळागाळातील सर्वसामान्य घटक असलेल्या पुरुष व महिला कामगारांना माणसासारखे जीवन जगावे व ते दर्जेदार असावे, यासाठी शासनाने त्यांच्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. त्यांच्या राहणीमानात आवश्यक असे साहित्य, मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती यासह अनेक योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या युती सरकारने आणल्या आहेत. सरकारला मिळत असलेल्या १ टक्का सेस मधून योजनांच्या माध्यमातून कामगारांना लाभ दिला जात आहे. त्याचा लाभ कामगारांनी घ्यावा असे आवाहनही केले. तसेच कामगारांचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. लवकरच सर्व प्रश्न राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मार्गी लागतील, असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा शिवसनेचे समन्वयक सचिन वालावलकर यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई व सरकारी कामगार अधिकारी सिंधुदुर्ग च्यावतीने आणि स्वाभिमानी कामगार संघ (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने नोंदीत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी अत्यावश्यक वस्तू व संच वितरण कार्यक्रम वेंगुर्ला नगरपरीषदेच्या सभागृहात आज शनिवारी पार पडला. यावेळी उपस्थित राहिलेल्या सुमारे ५०० पैकी ४१२ नोंदीत बांधकामगारांनी भांडी साहित्य संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरपरीषदेचे प्रशासकीय अधिकारी सौ. संगीता कुबल, शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक उमेश येरम, माजी सरकारी अधिकारी व ज्येष्ठ मार्गदर्शक किरण कुबल, शिवसेनेचे युवक शहर प्रमुख सागर गावडे. पदाधिकारी प्रतिक खानोलकर, भाजपाचे मातोंड येथील पदाधिकारी सोमा मेस्त्री, सौ. बागकर आदींचा व्यासपीठावर समावेश होता.