न्यू वंटमुरी सरकारी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण
बेळगाव : येथील समर्थनम दिव्यांग कल्याण संस्था व एसबीआय फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वैयक्तिक शिक्षण तसेच शिक्षक-विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण असा संयुक्त कार्यक्रम गुरुवार दि. 16 रोजी न्यू वंटमुरी येथील प्राथमिक शाळेत झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम. ए. माहुत व प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी एस. बी. दासप्पन्नवर उपस्थित होते. समर्थनम संस्थेचे अरुणकुमार एम. जी. यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. तसेच समर्थनम संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शबीर कुद्दण्णावर यांनी समर्थनम संस्थेने ग्रामीण भागात केलेल्या कार्याची माहिती दिली. शिवकुमार हल्याळी यांनी समर्थनम संस्थेने वैयक्तिक शिक्षण आणि शैक्षणिक मदत देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे सांगितले. शाळांतील वर्गखोल्यांची दुरुस्ती, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, शैक्षणिक साहित्य, स्मार्ट बोर्ड, दिव्यांगांना कृत्रिम पाय, व्हीलचेअर, कुबड्या, वॉटर बेड, एअर बेड यासारखे उपक्रम राबविले असल्याचेही हल्याळी यांनी सांगितले. कार्यक्रमाला बी. एम. बडिगेर, पी. एम. राजगोळकर, एम. ए. कोरीशेट्टी यांच्यासह शिक्षक, शाळा सुधारणा-व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.