विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण आजपासून
सेवा सिंधू पोर्टलवरून अर्ज दाखल करण्याची सुविधा
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) तर्फे शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना 2025-26 सालासाठी सवलतीच्या बसपासचे वितरण सोमवार दि. 2 पासून करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी सेवा सिंधू पोर्टलवरून अर्ज दाखल करण्यासाठी 31 मे पासून सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कर्नाटक वन, ग्राम वन व बेंगळूर केंद्रातून अर्ज दाखल करता येतो. मात्र, या केंद्रातून अर्ज दाखल करण्यासाठी 30 रुपये सेवा शुल्क आकारण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी बसपाससाठी अर्ज दाखल करताना आवश्यक असणारे घोषणापत्र सेवा सिंधू सॉफ्टवेअरवरून किंवा परिवहन महामंडळाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करावयाचे आहे. अर्ज दाखल करताना आपणाला सोयीस्कर असणाऱ्या काऊंटरची निवड करावयाची आहे, असे महामंडळाने कळविले आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर बसपास मिळण्यासाठी काऊंटरचा पत्ता विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. निर्धारित पासचे शुल्क क्रेडिट, डेबिट कार्ड, युपीआयद्वारे भरणा करण्यास मुभा आहे.
राज्य सरकारने महिलांना शक्ती योजनेंतर्गत राज्यात मोफत प्रवासाची सोय केली आहे. ही योजना विद्यार्थिनींनाही लागू आहे. मात्र, शेजारील राज्यात राहून कर्नाटकात शिक्षण घेणाऱ्या किंवा कर्नाटकात वास्तव्य करून शेजारच्या राज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना सवलतीच्या दरात बसपासची सुविधा असल्याचे परिवहन महामंडळाने म्हटले आहे.