For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधानांकडून 51 हजार नियुक्तिपत्रांचे वाटप

06:51 AM Oct 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधानांकडून 51 हजार नियुक्तिपत्रांचे वाटप
Advertisement

तुम्ही सेवक आहात, शासक नाही : गरीब-मागासांची सेवा करण्याचा नवनियुक्त कर्मचाऱ्यांना सल्ला

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशातील 40 ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्यात 51 हजार युवांना नियुक्तिपत्रांचे वाटप केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला रोजगार मेळावा आहे.  ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू रोजगार मेळाव्यांना सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत 13 मेळाव्यांमध्ये 8.50 लाखाहून अधिक युवांना नोकरी देण्यात आली आहे.

Advertisement

तुम्ही जनतेचे सेवक आहात, शासक नाही. याचमुळे गरीब-मागासांची सेवा करा, पुढील 25 वर्षांमध्ये तुम्ही विकसित भारत निर्माण कराल असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नियुक्तिपत्र प्राप्त झालेल्या युवांना उद्देशून म्हटले आहे.  देशात नवे तंत्रज्ञान यावे, नवी विदेशी गुंतवणूक यावी याकरता आम्ही योजना सुरू केली. मेक इन इंडिया अभियान आणि पीएलआय योजनेने मिळून रोजगार निर्मितीचा वेग अनेक पटीने वाढविला आहे. प्रत्येक क्षेत्रात उद्योगांना बळ मिळत आहे. युवांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचा दावा मोदींनी केला आहे.

पंतप्रधानांकडून योजनांचा उल्लेख

लखपति दीदी : आमच्या सरकारने 3 कोटी महिलांना लखपति दीदी करण्याचे लक्ष्य बाळगले आहे. आतापर्यंत सुमारे 1.25 कोटी महिला लखपति दीदी झाल्या आहेत. म्हणजेच त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. या योजनेमळे ग्रामीण महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराचे नवे साधन दिले आहे. मागील एक दशकात 10 कोटी महिला स्वयंसहाय्य गटांशी जोडल्या गेल्या आहेत. या महिलांना सरकारने पूर्ण समर्थन दिले असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

पंतप्रधान इंटर्नशिप : भारताच्या युवांची क्षमता वाढविण्यासाठी कौशल्य विकासावर लक्ष आहे. आम्ही स्किल इंडियासारखी मोहीम हाती घेतली असून शेकडो कौशल्य विकास केंद्रांमध्ये युवांना प्रशिक्षण दिले जात आहे.  अनुभव आणि संधीसाठी हिंडावे लागू नये याची व्यवस्था केली आहे. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या अंतर्गत 500 आघाडीच्या कंपन्यांना पेड इंटर्नशिपची व्यवस्था करण्यात आली आहे. दर महिन्याला 5 रुपये दिले जाणार आहेत. एक कोटी युवांना इंटर्नशिपची संधी दिली जाणार असल्याचे मोदी म्हणाले.

अन्य देशांसोबत करार : विदेशात भारतीयांना सहजपणे नोकरी मिळावी म्हणून सरकार पाऊल उचलत आहे. जर्मनीने भारतासाठी स्किल वर्क फोर्स स्टॅटेजी जारी केली आहे. भारतीय युवांना दरवर्षी 90 हजार व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ युवांना होईल. 21 देशांसोबत रोजगाराशी निगडित करार करण्यात आले आहेत. मध्यपूर्वेसोबत जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, मॉरिशस, इस्रायलसारखे देश यात सामील आहेत असे मोदींनी सांगितले आहे.

खादी ग्रामोद्योगाचा विकास : मागील 10 वर्षांच्या धोरणांमुळे खादी आणि ग्रामोद्योगाचे पूर्ण चित्रच बदलले आहे. हे क्षेत्र आता दरवर्षी 1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल करत आहे. संपुआ सरकारच्या तुलनेत खादीच्या विक्रीत 400 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. याचा लाभ कारागिर आणि विणकर तसेच व्यापाऱ्यांना होत आहे.

नोकरदार युवांना आवाहन

1 नागरिकांची सेवा करा : नोकरी प्राप्त केलेल्या युवांनी नेहमी नागरिकांना अधिकाधिक सुविधा प्राप्त होईल हेच लक्ष्य बाळगावे. युवांना सरकारी नोकरी मिळण्यात करदाते आणि नागरिकांचे महत्त्वाचे योगदान आहे. नागरिकांच्या सेवेकरताच ही संधी आम्हाला मिळाली आहे. नागरिकांच्या जीवनातील अडचणी कमी करणे हेच आमचे उद्दिष्ट असावे. कुठल्याही पदावर असला तरीही देशवासीयांची सेवा करा असे मोदींनी युवांना उद्देशून म्हटले आहे.

2 विनम्र व्हा, शिकत रहा : वैयक्तिक आयुष्यातही हे युवा नवा प्रवास सुरू करणार आहेत. या युवांनी नेहमी विनम्र रहावे असा माझा आग्रह आहे. स्वत:च्या या प्रवासात काही नवे शिकण्याची सवय सोडू नका. सरकार स्वत:च्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक अभ्यासक्रम उपलब्ध करते.  डिजिटल ट्रेनिंग मॉड्यूलचा लाभ घ्या. युवांच्या मेहनतीमुळे विकसित भारताचे लक्ष्य साध्य होणार असल्याचे मोदींनी नमूद केले.

विकसित भारतासाठी मेहनत : विकसित भारताचा संकल्प आम्ही घेतला आहे. प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करायची आहे. युवांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही. युवांकडून देश अपेक्षा बाळगून आहे, या अपेक्षाच आमचा विश्वास आहे. एक उज्ज्वल भविष्य आणि एक विकसित भारत निर्माण करण्यासाठी मिळून काम करण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले.

Advertisement
Tags :

.