16 गावांतील 2842 मालमत्ता पत्रकांचे आज वितरण
कोल्हापूर :
राज्य सरकारचा महसूल विभाग, पंचायत राज विभाग, भारतीय सर्व्हेक्षण संस्था आणि भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या वतीने स्वामित्व योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेद्वारे गावातील मिळकत धारकाला ‘दस्तऐवजाचा’ हक्क प्रदान केला जात आहे. त्यानुसार शनिवारी (18 रोजी) दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील 50 लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण होणार आहे. त्यानंतर जिह्यातील 16 गावांतील 2 हजार 842 मिळकतींच्या सनदा वितरीत केल्या जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती भूमि अभिलेखचे जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले व जि. प. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी ‘तरुण भारत संवाद’ला दिली.
स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या मालकी हक्काची कागदपत्रे उपलब्ध होणार असल्यामुळे ते अधिक सक्षम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 50 लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करताना लाभार्थ्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमांनंतर राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या स्थानिक कार्यक्रमामध्ये प्रॉपटी कार्डचे प्रत्यक्ष वितरण केले जाणार आहे. आत्तापर्यंत या योजनेंतर्गत कोल्हापूर जिह्यातील गावठाण सर्व्व्हेक्षण न झालेल्या 756 गावांचे ड्रोन सर्व्हे पूर्ण केले. त्यामधून 559 गावची 91 हजार 802 मालमत्ता पत्रक तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यामध्ये 1 ऑक्टोबर 2024 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत तयार केलेल्या कोल्हापूर जिह्यातील 16 गावांच्या 2 हजार 842 सनदांचे वितरण ग्रामपंचायत स्तरावर केले जाणार आहे. तसेच भूमि अभिलेख विभागाच्या नियुक्त कर्मचाऱ्यांकडून सर्व ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या गावातील लोकनिर्वाचीत लोकप्रतिनिधी, समाजातील महत्वाच्या व्यक्ती प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी यांच्यापैकी किमान 50 लोकांना पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्याबाबतचे प्रशिक्षण संबंधित नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे.
या कार्यक्रमासाठी केंद्रशासनाकडून जिल्हानिहाय मुख्य प्रमुख पाहुण्यांची नियुक्ती केली असून जिह्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे प्रमुख पाहुणे आहेत. कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात होत असून जिह्यातील लोकप्रतिनीधी, प्रशासकीय अधिकारी व लाभार्थ्यांना या ठिकाणी निमंत्रित केले आहे.
- पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड तालुक्यातील 16 गावांमध्ये होणार वितरण
जिह्यातील 3 तालुक्यांमधील 16 गावांतील 2 हजार 842 मालमत्ता पत्रकांचे शनिवारी वितरण केले जाणार आहे. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावातील 398, पन्हाळा तालुक्यातील गुडे 92, कसबा बोरगाव 208, म्हाळुंगे तर्फ बोरगाव 112, म्हाळुंगे तर्फ ठाणे 41, पोर्ले तर्फ बोरगाव 147 तर चंदगड तालुक्यातील चुर्णीचावाडा 23, गुडेवाड 365, जट्टेवाडी 176, तावरेवाडी 96, कोकरे 214, देवरवाडी 127, कोलीक 330, मोटनवाडी 121, लक्कीकट्टे 219 तर शिवणगे गावातील 173 मिळकतींच्या मालमत्ता पत्रकांचे वितरण केले जाणार आहे.