For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतर की अर्थपूर्ण अवकाश ?...

06:22 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
अंतर की अर्थपूर्ण अवकाश
Advertisement

एकमेकांसाठी बदलणं, एकमेकांच्या आवडी निवडींना प्राधान्य देणे या गोष्टी आवश्यक आहेत त्याबाबत दुमत नाही. परंतु ते किती आणि कसे? दुसऱ्याच्या मताचा आदर राखत एकमेकांना ‘नाही’ म्हणण्याचे स्वातंत्र्य आणि त्या ‘नाहीचा’ खुल्या दिलाने दोघेही स्विकार करत आहेत का? हेही महत्त्वाचे!

Advertisement

मडम, काय करावे सुचत नाही. माझी मुलगी स्नेहा गेले दिड महिना माझ्याजवळ आहे. या मुलीला कसं समजवावे तेच कळत नाही. लग्न होऊन अवघी पाच सहा वर्षे झाली आहेत. संसाराला कंटाळून निघून आली आहे.

काय झाले आहे? सासरी काही प्रॉब्लेम आहे का?

Advertisement

तसं काही नाही. स्नेहाचाच सगळा गोंधळ आहे.

खरं सांगायचं तर वेगवेगळी कौशल्य असलेली उच्चशिक्षीत मुलगी ही! करिअरकडे कल असणारी म्हणा ना! आमच्याकडे सारेच उत्तम शिकलेले आणि उच्चपदस्थ! अगदी मोकळं वातावरण. अर्थात ती शिकली म्हणून किचनमधले तिला काही येत नाही, अशातला भाग नाही. घरात सगळी कामे समजुतीने विभागून करण्याची सवय आहे. त्यामुळे काही करता येत नाही असंही नाही. तिच्या सासरची मंडळी ही उच्चशिक्षित आहेत. माणसे चांगली आहेत. तसा म्हणावा असा काही प्रॉब्लेम नाही.

परंतु थोडं असं झालं की स्नेहाचे लग्न झाल्यानंतर महिनाभरात तिच्या सासुबाईंना अर्धांगाचा झटका आला. ही तशी अगदी नवीनच. तिच्याखेरीज घरात कुणी स्त्राr नाही. त्यावेळी तिच्या सासऱ्यांनी आणि मी तिला समजावले होते की असलेली चांगली नोकरी सोडण्याचा निर्णय शक्यतो घेऊ नको. परंतु तिने ऐकले नाही. स्नेहाने स्वत:च नोकरी सोडायचा निर्णय घेतला. आम्हीही तिच्या निर्णयामध्ये फार इंटरफेअर केलं नाही.

तिने सगळं नीट केलं सासुबाईंचं! महिनाभराने त्या अगदी व्यवस्थित बऱ्याही झाल्या. नातेवाईकांनी खूप कौतुक केले! त्या कौतुकाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं तिला. आदर्श सून वगैरे..

मी तिला काही गोष्टी त्याहीवेळी समजावून सांगितल्या. परंतु ते ‘गुडी गुडी’ म्हणून घेण्याचं, कौतुकाचं व्यसनंच लागलं म्हणा तिला!

नंतर पुढे वर्षभरातच स्नेहाला मुलगा झाला. आता नोकरी सोडलीच आहे तर आणि थोडं थांबूया असं करत करत पाच वर्षे ही पूर्ण घरातच बसली. अगदी स्पष्ट आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर मुळात केवळ किचन एके किचन करणं हा तिचा पिंडच नाहीये आणि तशी कुणीही सक्तीही केली नाही तिच्यावर! पण हीच खूप गुंतत गेली. आता हळूहळू चिडचिड सुरु झाली. सर्वांपासून हळूहळू अंतर राखू लागली. पाहुण्यांची सततची ये-जा आता तिला कंटाळवाणी वाटू लागली. गुणगान गाणारे तेच नातेवाईक, ‘पहिल्यासारखी राहिली नाही हो आता स्नेहा ...नव्याचे नऊ दिवस’ असे शेरे मारु लागले. ही आतून खूप दुखावली गेली. मुलाला तिथेच सोडून कंटाळून माहेरीच निघून आली आहे.

आता म्हणतेय संसार मला नको वाटतोय.

नवरा, सासू सासरे, मुल, नातेवाईक सतत त्यांची उठबस, चहापाणी, नाष्ते, जेवण यालाच तिने पार गुरफुटुन घेतले होते. खूप अटेंटीव्ह राहण्याची सवय लावली की गोंधळ आलाच!

तसं पहायला गेलं तर सासरी त्रास नाही. नवराही चांगला आहे. सगळं छान आहे परंतु ही म्हणतेय मी पार कंटाळले आहे. तिने तिचा मार्ग निवडायचा ठरवलंय.

काल मी तिला विचारलं, ‘अगं तुला घरच्यांची, नवऱ्याची आठवण येत नाही का?मुलाला पहावसं वाटतं नाही का? तर म्हणाली, ‘हल्ली मला कसलाच फरक पडत नाही. कुणी सोबत नसलं तरीही काही वाटत नाही. दीड महिना ही इथे राहिली आहे. नुसती भटकते आहे पण तिला ना मुलाची आठवण ना नवऱ्याची...मी विचारलं तिला, ‘अगं अचानक काय झालं तुझं? मी तेव्हा स्वत:साठी वेळ दे, किती वेळा सांगितलं तुला. तर तेव्हा म्हणायचीस, ‘काही गरज नाही.’

अगं हो. तेव्हा तसंच वाटायचं. पण आता मला माझा वेळ हवाय. माझी माझी ‘स्पेस’ हवी आहे.

तिला मी माझ्यापरीनं खूप समजावून सांगितलं की स्वत:साठी वेळ काढणं म्हणजे काय? ते का करायला हवं वगैरे..पण हिच्या डोक्यात ते शिरतंच नाहीये. मला अपेक्षित असलेली, मी सांगत असलेली ‘स्पेस’ वेगळी. ती ही ‘स्पेस’ नाही. तिच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतोय..अंतर वाढतंय. जाणीवा बोथट होत जाणं म्हणजे स्पेस नव्हे ना हो? मला हे काही ठीक वाटतं नाही. म्हणून अधिक वेळ न घालवता तुमच्याकडे घेऊन आले. हे खूपच झालंय हल्ली..

माझा भाचा तोही असाच..काही वर्षे संसार केला. बायको म्हणेल ते आणि तसं असाच वागत राहिला. लग्न झाल्यावर हाच का तो? असा प्रश्न पडावा इतका गुरफटला. आता म्हणतो मला माझी स्पेस हवीय. झालं..सगळं विस्कटायच्या मार्गावर आहे. बायकोला वाटतंय याचं प्रेम कमी झालं किंवा याचे दुसरीकडे अफेअर सुरु असेल. पण तसं काहीच नाहीये.

काय करावं या मुलांचे काही समजत नाही.

स्नेहाची आई खूप अस्वस्थ झाली होती.

स्नेहा सोबत खूप वेळ चर्चा झाली. चांगुलपणाचे ओझे, तिची होणारी घुसमट, तिच्या मनातील स्पेस संदर्भातील गोंधळ, काय करणे गरजेचे आहे यावर चर्चा झाली आणि आलेली मानसिक मरगळ दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी, काही तंत्र आत्मसात करण्यासाठी ती तयारही झाली. काही काळ ती सातत्याने येत राहिली. काही कालावधीनंतर तिच्यामध्ये बराच बदल झाला.

स्पेसची संकल्पना, स्वातंत्र्य या बाबतीत अनेकांची गल्लत होताना दिसते.

विवाहाच्या अगदी सुरवातीला किंवा काही वेळा वर्षानुवर्षे अनेक स्त्रिया नवऱ्याच्या दिनक्रमाभोवती आपला दिनक्रम कसरत करत अगदी धडपडीने विणताना दिसतात. त्याला हवं तसं, तो म्हणेल तिथे जायचं, त्याच्या आवडीचाच स्वयंपाक, त्याला आवडतील असेच कपडे अगदी त्याच्या पावलामागे पाऊल..काही पुरुषांच्या बाबतीतही हे पहायला मिळते. ती म्हणेल तसं, त्या पद्धतीने तो किंवा अगदी तिच्या पावलावर पाऊल ठेवत चालायचं..

एकमेकांसाठी बदलणं, एकमेकांच्या आवडी निवडींना प्राधान्य देणे या गोष्टी आवश्यक आहेत त्याबाबत दुमत नाही. परंतु ते किती आणि कसे? दुसऱ्याच्या मताचा आदर राखत एकमेकांना ‘नाही’ म्हणण्याचे स्वातंत्र्य आणि त्या ‘नाहीचा’ खुल्या दिलाने दोघेही स्विकार करत आहेत का? हेही महत्त्वाचे! नात्याचे संगोपन करताना त्याला मायेचे, प्रेमाचे, आपुलकीचे, तडजोडीचे सिंचन लागतेच! परंतु ते करत असताना विविध गोष्टींच्या स्विकाराचा परिघ तुम्ही कसा आणि किती कौशल्याने आखत आहात हेही तितकेच महत्त्वाचे!! नाहीतर मग सुरवातीला काही वर्षे सारे छान असते. नंतर त्याने किंवा तिने थोडा वेळ स्वत:साठी ठेवायला सुरवात केली, काही बाबतीत ‘नाही’ म्हटले जाऊ लागले की फारच बदललीस तू/बदललास तू अशी सुरवात आणि त्यावरुन विकोपाला जाणारी असंख्य भांडणे पहायला मिळतात आणि नात्याचा प्रवास ‘अंतर’ वाढण्याच्या दिशेने होऊ लागतो. अगदी संसारात रमली हो ती असं म्हणणारे किंवा आदर्श सून आहे अगदी! असे कौतुक करणाऱ्या नातेवाईकांच्या, लोकांच्या टीकेची ‘ती’ धनी होऊ लागते. म्हणून स्त्राr काय किंवा पुरुष काय दोघांनीही हे लक्षात घ्यायला हवे की पत्नी, आई, मुलगी, सून, बहीण किंवा पती, बाबा, मुलगा, जावई, भाऊ या साऱ्या आपल्या भूमिका आहेत. त्या आवश्य नीट पार पाडाव्या परंतु ते करत असताना स्वत:साठी थोडा ‘अवकाश’ काढायला हवा. ‘अवकाशा’मध्ये आपले आत्मभान, स्व विषयक जाणीव, विकास कसा होईल हे पहायला हवे. त्या वेळात आपली बलस्थाने, उणीवा कोणत्या याकडेही लक्ष द्यायला हवे. ज्या उणीवा असतील त्यावर कशा पद्धतीने काम करता येईल याचा विचार आणि तदनुसार कृती..यावरही विचार व्हायला हवा.

अॅड. सुमेधा सं. देसाई

Advertisement
Tags :

.