महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

असंतुष्टांची बंडाळी अन् आप्तांची कोंडाळी!

06:30 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निवडणुका जाहीर झाल्यानंतर साहजिकच सर्वच राजकीय पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी असते. ज्यांना उमेदवारी मिळत नाही, त्यापैकी बहुतेक जण आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध दंड थोपटतात. प्रसंगी बंडाचा झेंडा फडकवतात. यापैकी खूप कमी जणांना निवडणुकीत यशही मिळते. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर कर्नाटकात काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षात बंडाळी माजली आहे. खासकरून भाजप नेतृत्वाविरुद्ध दंड थोपटणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

Advertisement

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे चिरंजीव व प्रदेश भाजप अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, शिमोग्याचे उमेदवार व विद्यमान खासदार बी. वाय. राघवेंद्र यांच्याविरुद्ध तर माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी उघडपणे बंडाचे निशाण फडकवले आहे. राघवेंद्र यांच्याविरुद्ध अपक्ष म्हणून शिमोग्यात निवडणूक लढविण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.

Advertisement

सगळ्यात आधी भाजपने आपल्या पक्षाच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे सगळ्यात आधी याच पक्षातील असंतोषही उफाळून आला. के. एस. ईश्वरप्पा हे कर्नाटकातील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाच्या जडणघडणीत सुरुवातीपासून त्यांचाही वाटा आहे. हावेरीमधून आपले चिरंजीव के. ई. कांतेश यांना लोकसभेची उमेदवारी मागितली होती. पक्षाने कांतेशऐवजी माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ईश्वरप्पा आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध भडकले आहेत. आपल्या मुलाची उमेदवारी हुकण्यासाठी येडियुराप्पा हेच जबाबदार आहेत. पक्षात घराणेशाही माजली आहे. येडियुराप्पा आणि त्यांच्या दोन मुलांनी पक्षावर कब्जाच केला आहे. हिंदुत्वनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्यांना पक्षात स्थान नाही. येडियुराप्पा ठरवतील तेच होते आहे. येडियुराप्पा यांचा मुलगा आमदार होऊ शकतो, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो, दुसरा मुलगा खासदार होऊ शकतो तर आपल्या मुलाला उमेदवार का मिळत नाही, असा प्रश्न ईश्वरप्पा यांनी उपस्थित केला आहे.

संतप्त ईश्वरप्पा यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाने प्रयत्न चालवले आहेत. मात्र, ते कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आपण शिमोग्यातून निवडणूक लढवणारच, आपला विजय हा निश्चित आहे. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर थेट दिल्लीला जाऊन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपला पाठिंबा जाहीर करू, असे जाहीर करतानाच घराणेशाहीपासून पक्षाला वाचवण्याची हाकही त्यांनी दिली आहे. आपले हृदय चिरले तर एका बाजूला राम आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी दिसतात. येडियुराप्पा यांचे हृदय चिरले तर एका बाजूला त्यांची दोन मुले, दुसऱ्या बाजूला शोभा करंदलाजे यांचे दर्शन होते. त्यामुळे एकाधिकारशाही व घराणेशाहीपासून पक्ष वाचवण्याचे आवाहन त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाला केले आहे. त्यांच्यापाठोपाठ आणखी एक माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांनीही आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध तोंड उघडण्यास सुरुवात केली आहे. त्यांनाही या निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही. सदानंदगौडा काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. पत्रकार परिषद घेऊन या चर्चेला पूर्णविराम देताना कोणत्याही परिस्थितीत आपण काँग्रेसमध्ये जाणार नाही, भाजपमध्येच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

माजी मंत्री जे. सी. माधुस्वामी हे तुमकूरमधून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यांना डावलून माजी मंत्री व्ही. सोमण्णा यांना उमेदवारी दिल्याने माधुस्वामी संतप्त झाले आहेत. दावणगेरे येथे विद्यमान खासदार सिद्धेश्वर यांची पत्नी गायत्री यांना भाजपची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे माजी मंत्री रेणुकाचार्य यांनी उमेदवार बदला नाही तर आम्ही निवडणूक प्रचारात भाग घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. बेळगावचा तिढा कायम आहे. विद्यमान खासदार मंगला अंगडी यांची उमेदवारी हुकणार आहे. त्यांच्या बदल्यात त्यांचे व्याही माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना बेळगावची उमेदवारी दिली जाण्याची कुजबुज आहे. बेळगावातील स्थानिक नेत्यांची खदखद वाढली आहे. त्यामुळेच ‘गो बॅक शेट्टर’चे नारे सुरू झाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपला राम राम ठोकून जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये गेले होते. हुबळीत त्यांचा पराभव झाला. काँग्रेसने विधान परिषदेवर त्यांची वर्णी लावली. कदाचित काँग्रेसमधील वातावरण लहानपणापासूनच जनसंघाच्या तालमीत तयार झालेल्या जगदीश शेट्टर यांना रुचले नाही. त्यामुळेच सहा महिन्यात ते पुन्हा भाजपमध्ये आले. धारवाड किंवा हावेरीतून लोकसभा निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा होती. धारवाडमधून केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांना तर हावेरीत माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जगदीश शेट्टर यांच्यासाठी बेळगावचा पर्याय राहिला. बेळगावातून नशीब आजमावण्यासाठी त्यांनी होकार दिला आहे. मात्र, बेळगावात त्यांना विरोध होत आहे. त्यामुळे बेळगावचा निर्णय घेणेही पक्षाला कठीण जात आहे.

भाजपबरोबरच काँग्रेसमध्येही अनेक ठिकाणी बंडाला सुरुवात झाली आहे. खरेतर भाजपबरोबर युती केलेल्या निजदची वाटचाल या निवडणुकीत स्पष्ट आहे. भाजपने केवळ तीन मतदारसंघ निजदला देण्याचे ठरविले आहे. उर्वरित मतदारसंघात निजदचा भाजपला पाठिंबा असणार आहे. तरीही निजदमध्येही अस्वस्थता आहे. भाजपशी केलेली युती अनेकांना रुचली नाही, पचली नाही. विधान परिषद सदस्य मरितिप्पेगौडा यांनी यासाठीच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कठीण प्रसंगी पक्ष टिकविण्यासाठी निजदने भाजपबरोबर युती केली असली तरी आतापासूनच आम्ही युती का केली? असे निजद नेत्यांना वाटू लागले आहे. गेल्या आठवडाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारासाठी दोन वेळा कर्नाटक दौऱ्यावर आले. खरे तर जिथे निजदची मुळे घट्ट आहेत, तिथे तरी निजद नेत्यांना भाजपच्या व्यासपीठावर बोलवायला हवे होते. दोन्ही वेळा त्यांना बोलावण्यात आले नाही. केवळ तीन जागा मिळविण्यासाठी आम्ही त्यांच्याशी युती केली आहे का? अपमानास्पद वागणूक देऊ नका, असे भाजपला कुमारस्वामी यांनी ठणकावून सांगितले आहे. पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नाराजी व्यक्त केल्यानंतर ते थेट चेन्नईला गेले आहेत. चेन्नईत गुरुवारी त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रियाही झाली. तेथून परतल्यानंतर भाजप-निजद युतीचे जागावाटप जाहीर होणार आहे.

एकंदर घराणेशाहीच्या राजकारणावर सर्वच पक्षातील असंतुष्टांनी नाराजी व्यक्त केली असली तरी आपल्या मुलाला किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालेलेच घराणेशाहीवर बोलू लागले आहेत. एखाद्या कार्यकर्त्याची उमेदवारी हुकली म्हणून कोणीच आपल्या पक्षाविरुद्ध, पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध बंडाची भूमिका घेतली नाही, हे विशेष.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article