अनेक राज्यांमध्ये काँगेस पक्षात धुसफूस
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एकीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सुरु असताना दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये काँगेसमधील अंतर्गत मतभेदांनी पक्ष पोखरला जात आहे. पक्षातील विविध गटातटांनी पक्षनेत्याच्या पदयात्रेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून गांधी देश जोडण्याची भाषा करीत असताना काँगेस पक्षात दुफळी माजल्याचे विसंगत सत्य समोर आल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.
स्वतः राहुल गांधी त्यांच्या काही विधानांमुळे वादग्रस्त ठरले आहेत. त्यांनी महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरकांसंबंधी वादग्रस्त विधाने केली होती. त्यानंतर अनेक काँगेस नेत्यांनी वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरु केली. पक्षाध्यक्ष खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून 100 तोंडाचा रावण असे शब्द वापरले. चीन आमच्या सैनिकांना मारहाण करीत आहे, असे विधान राहुल गांधी यांनी राजस्थानात केले. तर पक्षाचे उत्तर प्रदेशातील नेते अजय राय यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना उद्देशून ‘लटके झटके’ असा अवमानजनक उल्लेख केला होता.
राज्याराज्यांमध्ये मतभेद
तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या सर्व राज्यांमध्ये काँगेसमध्ये गटतटांचे परस्परविरोधी राजकारण सुरू आहे. तेलंगणात नुकताच 12 पक्षनेत्यांनी राजीनामा दिला असून ते अन्य पक्षांमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राजस्थानात मुख्यमंत्री गेहलोत आणि राजेश पायलट यांच्यातील वाद अद्याप संपुष्टात आलेला नाही. कर्नाटकात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि ज्येष्ठ नेते डी.के. शिवकुमार यांच्यातून विस्तव जात नाही. हरियाणातही माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा आणि इतर स्थानिक नेते यांच्यात वर्चस्वासाठी वाद आहे. नवीन पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या वादांमध्ये लक्ष घालून ते मिटविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा असली तरी त्यांनीही अद्याप त्या दिशेने हालचाल सुरु केल्याचे दिसत नाही. परिणामी, राहुल गांधी यांच्या यात्रेचा पक्षाला बळकट करण्यासाठी कितपत उपयोग होईल आणि काँगेस पुन्हा उभी राहील का, यासंबंधी शंका उपस्थित केल्या जात आहेत.