घटनाबाह्य सरकार बसवून संविधानाचा अवमान
सरकार स्थापन करून भाजपला काय मिळाले : दापोलीतील जाहीर सभेत आदित्य ठाकरेंचा सवाल
दापोली :
लोकाभिमुख काम करणारे महाविकास आघाडीचे लोकप्रिय सरकार उलथवून राज्यात महायुतीने घटनाबाह्य सरकार बसवून संविधानाचा अवमान केल्याची टीका ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दापोली येथे केली. आपण इथे आलो आहोत ते बदला घेण्यासाठी नाही तर बदलाव करण्यासाठी. घटनाबाह्य सरकार स्थापन करून भाजप आणि संघाला काय मिळाले, असा सवालही ठाकरे यांनी केला.
महाविकास आघाडीचे दापोली विधानसभा उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकालगत आदित्य ठाकरेंची सभा पार पडली. ते पुढे म्हणाले घटनाबाह्य सरकारमध्ये भाजपचे १० मंत्री असूनही केवळ सहाच मंत्रीमूळ शिवसेना फोडून आले आहेत. तर राष्ट्रवादीचे नऊ मंत्री हे मूळ राष्ट्रवादी पक्ष फोडून आले आहेत. ज्यांच्या विरोधात भाजप संघाचे कार्यकर्ते लढले, ज्यांच्या विरोधात त्यांनी मतदान केले, ज्यांच्या विरोधात केसेस अंगावर घेतल्या, तुरुंगात गेले, त्यांच्याच पुण्यात अजित पवार यांना पालकमंत्री केले गेले. महामंडळे, मंदिराचे न्यास यावर शिवसेनेतील व राष्ट्रवादीतील फुटून आलेल्यांना पदे मिळाली. वारकरी जरांगे यांच्यावर शिंदे सरकारने लाठीचार्ज केला. या सरकारमध्ये भाजप व संघाच्या कार्यकर्त्याला काय मिळाले? याचा भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांनी जरूर विचार करावा. आपली लढाई ही राज्य वाचवणारी लढाई आहे. आमदार बनण्यासाठी ही लढाई नाही. योगी आदित्यनाथ व शहा हे बाहेरून येऊन आम्हाला उत्तरप्रदेश व गुजरातचे मॉडेल दाखवतात. मात्र कोविडच्या काळात उत्तरप्रदेशप्रमाणे गंगेमध्ये महाराष्ट्रात प्रेते वाहिली नाहीत, की गुजरातप्रमाणे ऑक्सिजनसाठी लोकांना रांगा लावाव्या लागल्या नाहीत. कोविडच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सर्वांचा जीव वाचवला. जात-पात न पाहता प्रत्येकाचा जीव वाचवला. महाराष्ट्र धर्म जागवला. कोविडच्या काळात उद्धव ठाकरे यांनी एनडीआरएफचे निकष वाढवून येथील जनतेला दिलासा दिला, असेही आदित्य म्हणाले.