महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बर्नाडला अपात्र ठरवा, निवडणूक लढण्यास बंदी घाला

11:42 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोवा खंडपीठाचा पंचायत संचालनालयाला आदेश : अख्खं कुटुंब बेकायदेशीर बांधकामांत गुंतल्याचे प्रकरण

Advertisement

हरमल येथील बेकायदेशीर मालमत्ताप्रकरणी राजीनामा देण्यास भाग पडलेला तेथील माजी सरपंच आणि विद्यमान पंच बर्नार्ड फर्नांडिस याच्या घरातील सदस्यांसोबत अन्य नातेवाईकांनी मिळून तब्बल 33 बेकायदेशीर बांधकामे उभारल्याचे आणि त्यात व्यावसायिक आस्थापने सुऊ केल्याचे उघड झाले आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून पंचायत राज कायद्याखाली कडक कारवाई करून त्याला पंच पदावरून हटवण्यात यावे, पाच वर्षासाठी निवडणूक लढण्यास त्याला अपात्र ठरवण्याची प्रक्रिया पंचायत संचालनालयाने हाती घ्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्या. वाल्मिकी मिनेझिस व न्या. महेश सोनक यांनी दिला आहे.

Advertisement

पणजी : हरमल किनारी भागात असलेल्या गिरकरवाड्यावरील ‘विकास प्रतिबंधित’ क्षेत्रातील (एनडीझेड) बेकायदेशीर 64  बांधकामांना ‘कारणे दाखवा’ नोटिस पाठवून कायदेशीर कारवाई सुऊ करण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणांनी तपास केल्यानंतर तत्कालीन सरपंच बर्नार्ड फर्नांडिस याच्या घरातील तीन भाऊ, वहिनी, आई, बहिणी, काका आणि अन्य नातेवाईकांची तब्बल 33 बेकायदेशीर बांधकामे असल्याचे उघड झाले आहे.

 बर्नार्डचा पळवाट शोधण्याचा प्रयत्न

बर्नार्ड फर्नांडिस याने एकूण बेकायदेशीर मालमत्तांपैकी आपल्या वाट्यातील बांधकामांवर कारवाई करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. मात्र, यावेळी बर्नार्ड याचा भाऊ आवेलींनो याने न्यायालयात हजर राहून आपल्या बांधकामाला पंचायतीचा परवाना असल्याचे सांगितले.

 बांधकामांची माहिती देण्याचा आदेश

हरमल पंचायतीचे वकील गावकर यांनी या बांधकामांना पंचायतीने कसलाही बांधकाम परवाना दिला नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर आवेलींनो याने आपला शब्द फिरवून पंचायतीने फक्त घर क्रमांक दिला असल्याचे मान्य केले. त्याआधी बर्नार्ड याने आपल्या प्रतिज्ञापत्रात सदर बेकायदेशीर बांधकामांना कोणत्याही सरकारी खात्याचा परवाना नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर खंडपीठाने बर्नार्ड याच्या  सर्व कुटुंबीय सदस्यांना एका आठवड्यात प्रतिज्ञापत्राद्वारे आपापल्या मालकीच्या बांधकामाबाबत स्पष्टता, सरकारी परवाने आदींची माहिती देण्याचा आदेश दिला आहे.

 बर्नार्डने केला अधिकारांचा गैरवापर

सरपंच आणि स्थानिक पंच म्हणून बर्नार्ड फर्नांडिस याने आपल्या कर्त्यव्यात मोठी कुचराई केली आहे. मिळालेल्या अधिकाराचा थेट गैरवापर केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पंचायत संचालनालयाने पंचायत राज कायद्याचे कलम- 210/अ खाली सर्व कायदेशीर तत्वांचे पालन करून बर्नार्डला ‘कारणे दाखवा’ नोटिस पाठवून त्याची बाजू ऐकून त्याच्यावर कारवाई करण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे.

लोकवस्ती 800 ची, बेकायदा बांधकामे 187!

माजी सरपंच आणि विद्यमान पंच बर्नार्ड फर्नांडिस हा 800 जणांची लोकवस्ती असलेल्या प्रभाग- 4 (गिरकरवाडा, हरमल) मधून निवडून आला होता. या एकाच प्रभागात ‘विकास प्रतिबंधित क्षेत्र’मध्ये (एनडीझेड) एकूण 187 बेकायदेशीर बांधकामे आढळली आहेत. यातील अधिकतर बांधकामे बर्नार्ड याच्या कुटुंबीय सदस्य आणि अन्य नातेवाईकांच्या मालकीची आहेत. एवढेच नव्हे, तर त्या बेकायदेशीर बांधकामांत बेकायदेशीर गेस्ट हाऊस, दुकाने, शॅक, रेस्टॉरंट्स अशी व्यावसायिक आस्थापनेही कार्यरत आहेत. या गोष्टीची न्यायालयाने गंभीर नोंद घेताना हे सर्व धक्कादायक असल्याचे नमूद केले आहे. संबंधितांनी यावर कारवाई करुन तिचा अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article