अमेरिका आणि चीनमध्ये पुन्हा वाद
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिका आणि चीन यांच्यात पुन्हा व्यापारशुल्काच्या संबंधात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी चीनवर कडाडून टीका केली असून चीनने अमेरिकेशी झालेल्या व्यापार कराराचा भंग चालविला आहे, असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे.
चीनवर मी जेव्हा 145 टक्क्यांचा कर लागू केला, तेव्हा चीनची अर्थव्यवस्था घसरणीला लागली. तेथील कारखाने बंद पडू लागले. चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेवर किती अवलंबून आहे हे यावरुन दिसून आले. चीनमध्ये अक्षरश: अराजकाचे वातावरण होते. अखेर, मला दया आली. ही स्थिती चीनसाठी किंवा काही प्रमाणात आमच्यासाठीही बरी नाही, असा विचार करुन आम्ही चीनशी वेगाने व्यापार करार केला. यात चीनची हानी टळावी असा हेतू होता. तथापि, चीनने याची जाण ठेवलेली दिसत नाही. चीनकडून या व्यापार समझोत्याचा भंग केला जात आहे. ही स्थिती योग्य नाही. आम्ही चीनला संभाव्य हानीपासून वाचविले आहे. पण चीनने याची परतफेड एका चांगल्या देशाप्रमाणे केलेली नाही, अशी टिप्पणी ट्रंप यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या वेबसाईटवर केली आहे.
वाद वाढणार ?
ट्रंप यांच्या टिप्पणीवर अद्याप चीनने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र, दोन्ही देशांमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा सर्वाधिक व्यापार चीनशी आहे. तसेच चीनच्या बाजूने फार मोठी व्यापारी तूटही अमेरिकेला सहन करावी लागत आहे. आता भविष्यकाळात ट्रंप चीनसंबंधी नेमकी कोणती भूमिका घेणार, हे आगामी काही काळात स्पष्ट होणार आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे.