कुंकळ्ळीतील धोकादायक कचऱ्याची विल्हेवाट लावा
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सूचना
पणजी : कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत (आयडीसी) सुमारे 5000 मेट्रिक टन धोकादायक कचरा साठविण्यात आला आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुंकळ्ळी आयडीसीमध्ये साठवलेल्या धोकादायक कचऱ्याचे एनईईआरआयमार्फत तपासणी केली होती. तसेच मंडळाने नमुने देखील गोळा केले होते. त्याचे विश्लेषण लॅबोरेटरी आणि सीपीसीबी मार्फत करण्यात आले होते. याबाबत मंडळाने हा धोकादायक कचरा हटविण्यासंबंधी पत्रव्यवहारही केला होता. तरीही तो तसाच जैसे थे स्थितीत असल्याने त्याची त्वरित विल्हेवाट लावा, असे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव संजीव जोगळेकर यांनी सूचित केले आहे.
जोगळेकर यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालकांशी पत्रव्यवहार करून कुंकळ्ळीआयडीसीतील कचऱ्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तेथील मेसर्स सनराइज झाइन लिमिटेडच्या या धोकादायक कचरा डंपची विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. गोवा राज्याने जीडब्ल्यूएमसीद्वारे पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत कचरा प्रक्रिया साठवणूक आणि विल्हेवाट सुविधा स्थापन केली आहे. ही सुविधा मेसर्स फोंडा एन्व्होकेअर लिमिटेडद्वारे चालवली जाते, याकडेही सचिव संजीव जोगळेकर यांनी पत्रात लक्ष्य वेधले आहे. 2025-2026 च्या अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुंकळ्ळी आयडीसीमधील धोकादायक कचरा पिसुर्ले येथील सीएचडब्ल्यूटीएसडीएफ येथे हलविण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित केली होती. तरीही यावर काहीच हालचाल झाली नसल्याने सदरचा पत्रव्यहार करून विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभागाने यात लक्ष घालावे, असे सूचविण्यात आले आहे.