न्यायालयाच्या देखरेखीखाली ड्रग्जची विल्हेवाट
मुख्यमंत्री सावंत यांची माहिती : 2037 पर्यंत गोवा राज्य होणार ड्रग्जमुक्त
पणजी : गोव्यात अमलीपदार्थांची पाळेमुळे खणून काढताना पोलिस, अमलीपदार्थ विरोधी विभाग यांचे काम उत्तमप्रकारे सुरू आहे. गोव्यात अनेक घटनांमधून अमलीपदार्थ (ड्रग्ज) जप्त करण्यात येतो. ह्या ड्रग्जचे पुढे काय केले जाते, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. परंतु गोव्यात जप्त करण्यात आलेला ड्रग्ज फक्त ताब्यात घेतला जात नाही, तर त्याची कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विल्हेवाट लावली जाते. विल्हेवाट लावताना अमलीपदार्थ विरोधी विभागामार्फत ड्रग्जचे, अमलीपदार्थांचे व्हिडियो तयार केले जातात, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने गोवा सरकारच्या सामाजिक कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने बांबोळी येथील श्यामा प्रसाद मुखर्जी मैदानावर आयोजित ‘नशामुक्त भारत’ ह्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. अमलीपदार्थ विरोधी मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी विविध एजन्सींमध्ये समन्वय वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. युवकांना व्यसनांपासून दूर करण्यासाठी तसेच त्यांना मुक्त करण्यासाठी राज्य सरकारद्वारे जागृती, प्रतिबंध आणि कडक अंमलबजावणी ह्या तिन्ही टप्प्यावर काम केले जाते, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘नशामुक्त भारत’ मोहीम सुरू केली आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न करतानाच येत्या 2037 पर्यंत सालापर्यंत गोवा राज्य पूर्णपणे अमलीपदार्थ मुक्त (ड्रग्ज) करण्यात येईल. त्यादिशेने प्रत्येक खाते आणि सरकारही प्रयत्नशील आहे. नशामुक्त भारत आणि नशामुक्त गोवा राज्य करण्याचे ध्येय आहे. ‘नशामुक्त भारत’ ह्या उपक्रमाखाली समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यात मोहीम सुरू करण्यात येणार आहे. व्यसन मुक्तीविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करीत असून, नागरिकांनीही ह्या मोहिमेत सक्रियपणे भाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
व्यसनमुक्तीच्या स्टॉलची पाहणी
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी मैदानावर ‘नशा मुक्त भारत’ या कार्यक्रमासाठी विविध विषयांवरील पुस्तकांची दालने उभारण्यात आली होती. यातील बहुतांश स्टॉल हे नशा मुक्तीसाठी काम करणाऱ्या संस्थांची होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय समाज कल्याण खात्याचे मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी पाहणी करून स्टॉलधारकांचे कौतुक केले.