For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंधश्र्रद्धा निर्मूलन ( भाग 2)

06:08 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंधश्र्रद्धा निर्मूलन    भाग 2
Advertisement

कलियुगामध्ये अज्ञानी लोक धर्माच्या नावाखाली चुकीच्या मार्गाने शास्त्रसंमत नसलेले तथाकथित धार्मिक विधी करतात. अंधश्र्रद्धेने देवी-देवतांना पशूंचे बळी दिले जातात. याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात आणिकांच्या कापिती माना । निष्ठुरपणा पार नाही ।। 1।।  करिती बेटे उसनवारी। यमपुरी भोगावया ।। 2 ।। सेंदराचे दैवत केले । नवस बोले तयासी ।। 3 ।। तुका म्हणे नाचिती पोरे। खोडिता येरे अंग दु:खे ।। 4 ।।  अर्थात “आपल्या पोटासाठी जे दुसऱ्यांच्या माना कापतात, त्यांच्या निर्दयपणाला सीमा नाही. पण यांना समजत नाही की पुढे यमपुरी भोगण्याची तरतूद आपण आधीच करीत आहोत. असे लोक दगडाला शेंदूर फासून त्याच्यापुढे नवस करतात, मला मूल होऊ दे मी तुझ्यापुढे कोंबडे, बकरी कापीन. अशी ही पोरकट दुसऱ्यांना त्रास देतात आणि पुढे त्यांनाही त्रास होतोच.” मांस खाता हौस करी । जोडुनी वैरी ठेवियेला ।।1।। कोण त्याची करील किंव । जीवे जीव नेणती ।।2।। पुढिलांसाठी पाजावी सूरी । आपुली चोरी अंगुळी।।3।। तुका म्हणे कुटिती हाडे । आपुल्या नाडे रडतील ।।4।। अर्थात “जो पशूंचा वध करून आनंदाने कोणी मांस खाईल तर त्याने वैरी जोडून ठेवला आहे हे तो जाणत नाही. आपल्या जीवांप्रमाणे दुसऱ्याचा जीव जाणत नाही तर अशा दुष्टाची दया कोणास येईल? दुसऱ्याचा वध करण्यास शस्त्राला (सूरीला) धार लावतो. त्यावेळी आपल्या करंगळीस देखील धक्का लागू देत नाही. दुसऱ्यांची हाडे कुटून खातात पण हत्येच्या कर्माचे फळ भोगताना दु:ख झाले की रडतील.”

Advertisement

लोकांना तीर्थयात्रा, कुंभमेळे, गावांमधील निरनिराळ्या जत्रा-यात्रा, धार्मिक स्थळ भेटी देणे खूप आवडते. धार्मिक स्थानांना भेटी देऊन निरनिराळ्या प्रकारचे कर्मकांड करून दान दक्षिणा देऊन, यज्ञ याग करून पाप पुण्य प्राप्त करण्याचा खटाटोप करीत असतात. अशा लोकांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात आली सिंहस्थ पर्वणी। न्हाव्या भटा धणी ।। 1।।  अंतरी पापाच्या कोडी । वरी वरी बोडी डोई दाढी ।। 2 ।। बोडीले ते निघाले। काय पालटले सांग वहिले ।। 3 ।। पाप गेल्याची खूण। नाही पालटले अवगुण।। 4 ।।  भक्तीभावेविण । तुका म्हणे अवघा सीण ।। 5 ।।  अर्थात “सिंहस्थ पर्वणी आली म्हणजे तीर्थक्षेत्रामधील भट आणि न्हावी असतात त्यांची चंगळ असते. अंत:करणात कोट्यावधी पापे आहेत असे असताना वरवर दाढी करून, मुंडन करून काय उपयोग? अंगावरी केवळ केस निघाले पण अवगुण गेले का सांगा? अवगुण गेले नाहीत तर पापाचे प्रायश्चित्त कसे होईल? हरीची शुद्ध भक्ती करण्यावाचून इतर सर्व कर्मकांड केवळ व्यर्थ श्र्रमच आहेत.”

आणखी एका अभंगात म्हणतात तीळ जाळिले तांदूळ । काम क्रोध तैसेचि खळ ।। 1 ।। कारे सिणलासी वाउगा । न भजता पांडुरंगा ।। 2।। मान दंभ पोटासाठी । केली अक्षरांची आटी  ।।3।।तप कऊनि तीर्थाटन । वाढविला अभिमान  ।।4।। वाटिले ते धन । केली अहंता जतन ।।5।। तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि अधर्म ।। 6।। अर्थात “यज्ञामध्ये तीळ, तांदूळ जाळून काय उपयोग, मनात काम, क्रोध इत्यादी विकार तसेच आहेत. अरे, पांडुरंगाची भक्ती न करता कशाला उगीच व्यर्थ त्रास करून घेतोस? ग्रंथांचे पाठांतर केलेस ते दांभिकपणे आणि आपल्याला मान सन्मान मिळावा म्हणूनच केलेस. तीर्थाटन केले, तपस्या केली त्याने अभिमान मात्र वाढला. धन वाटलेस, त्यामुळे मी मोठा दानशूर आहे हा अहंकार जतन केलास. अशा मार्गाने जाणारे साधक धर्माचे मुख्य मुद्दाच चुकले आणि धर्माच्या नावाने अधर्मच केला.”

Advertisement

अशा अनेक प्रथा, रूढी ज्या केवळ कांही तरी भौतिक प्राप्ती करावयासाठी अज्ञानाने केल्या जातात आणि बहुतेक भोंदू साधू, गुऊ इत्यादी तथाकथित धार्मिक व्यक्ती आपल्या भोळ्या आणि वासनेने आंधळ्या झालेल्या शिष्यांना फसवितात. यासाठी आध्यात्मिक मार्गावर असलेल्या प्रामाणिक साधकांनी श्रीमद भागवत ग्रंथामधून मार्गदर्शन घ्यावे जसे तुकाराम महाराजांनी घेतले आहे. श्रीमद भागवत मध्ये सांगितले आहे (भा. 1.2.8) धर्म: स्वनुष्ठित: पुंसां विष्वक्सेनकथासु य:। नोत्पादयेद्यदि रतिं श्र्रम एव हि केवलम् ।। अर्थात “आपल्या स्थितीनुसार धर्माचरण अर्थात कर्तव्यकर्म किंवा विहितकर्म करून देखील भगवंतांच्या लीलाकथांमध्ये ऊची उत्पन्न होत नसेल, तर असे धर्माचरण म्हणजे केवळ व्यर्थ श्र्रमच होत. ( भा. 1.2.9) धर्मस्य ह्यापवर्ग्यस्य नार्थोऽर्थायोपकल्पते। नार्थस्य धर्मैकान्तस्य कामो लाभाय हि स्मृत: ।। अर्थात “धार्मिक कर्तव्ये ही निश्चितपणे भौतिकतेतून मुक्त होण्यासाठी योजिलेली आहेत. ती कर्तव्ये भौतिक लाभासाठी कधीही करू नयेत. ऋषींच्या सांगण्याप्रमाणे जो मनुष्य परम धर्माच्या पालनात (भगवंताच्या सेवेत) संलग्न आहे, त्याने कधीही भौतिक लाभाचा उपयोग इंद्रियतृप्तीसाठी करू नये.” याविऊद्ध आपल्याला दिसून येते की धर्माच्या नांवाने अंधश्र्रद्धेचा बाजार अज्ञानी लोकांनी मांडलेला आहे.  आज समाजामध्ये अनेक प्रकारचे भोंदू गुऊ, साधू संत, धर्मोपदेशक, सामोपदेशक इत्यादी व्यक्ती चुकीचे मार्गदर्शन करून समाजाला फसवित आहेत. अशा भोंदू साधूंबद्दल तुकाराम महाराज म्हणतात देखोवेखी करिती गुऊ । नाही ठाऊका विचारू ।।1।। वर्म ते न पडे ठायी । पांडुरंगाविण काही ।।2।। शिको कळा शिको येति । प्रेम नाही कोणा  हाती ।।3।।  तुका म्हणे सार । भक्ती नेणती गव्हार ।।4।। अर्थात  “ एकाने गुऊ केलेला पाहून दुसरा मनुष्य गुऊ करतो, पण त्याला त्यातला खरा विचार माहित नसतो. पांडुरंगाच्या कृपेवांचून खरे परमार्थाचे मर्म कळणार नाही. इतर कोणत्याही कला शिकवल्याने शिकता येतात, पण हरीचे प्रेम मात्र कोणीही शिकवू शकत नाही. मूर्ख लोक हरिभक्तीचे खरे रहस्य जाणत नाहीत आणि परमार्थाच्या नावाने ते लोक भलतेच कांहीतरी करीत असतात.” आणखी एका अभंगात म्हणतात एक करिती गुऊ गुऊ ।भोंवता भारू शिष्यांचा ।।1।। पुंस नाही पाय चारी । मनुष्य परी कुतरिं ती ।।2।। परस्त्री मद्यपान । पेण्डखाण माजविले ।।3।। तुका म्हणे निर्भर । चित्ती अधोगती जावया ।।4।। अर्थात “काही लोक आपल्याला गुऊ म्हणवितात आणि शिष्यांचा समुदाय जमवून मिरवतात. असे लोक मनुष्यासारखे दिसत असले तरी शेपूट आणि चार पाय नसलेली कुत्रीच आहेत. परस्त्री भोगणे आणि मदिरा पिण्याचे यांनी स्तोम माजवले आहे, त्यांनी बैलाची पेंड खाणे सुऊ केले असे जाणावे. आपल्याला पुढे अधोगतीला जावे लागेल याचे भयसुद्धा त्यांना वाटत नाही.” कलियुगातील साधू कसे स्वत:ला अवधूत गजोशीत करून स्वत: आणि आपल्या शिष्यांना कसे अधर्माच्या मार्गाला लावतात, याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात “ऐसे संत झाले कळी । तोंडी तंबाखूची नळी ।।1।। स्नानसंध्या बुडविली । पुढे भांग ओढवली ।।2।।भांगभुर्का हे साधन । पची पडे  मद्यपान ।।3।। तुका म्हणे अवघे सोंग । तेथे कैचा पांडुरंग ।।4।।  अर्थात “या कलियुगामध्ये असे तथाकथित संत आहेत, की ज्यांच्या तोंडामध्ये तंबाखूची नळी असते त्यांनी स्नानसंध्यादि आचार बुडवून भांग ओढण्याची प्राप्ती करून घेतली आहे. भांग, तंबाखू खाणे, चहा-कॉफी, दारू इत्यादी मद्यपान करणे हेच त्यांच्या पचनी पडले आहे. हे सर्व ढोंगी आहेत, त्याठिकाणी पांडुरंग कसा असेल.”

गीता-भागवत नुसार गुऊ, साधू, संत, महात्मा हा भगवान श्रीकृष्णाचा प्रतिनिधी असावयास हवा आणि आपले कोणतेही शब्द भेसळ न करता जसा आहे तसा उपदेश करावयास हवा. पण या मार्गाचा त्याग करून नवीन कांहीतरी शिकवायचे आणि केवळ मन:शांती आणि शरीर स्वास्थ हेच अध्यात्म आहे असे शिकवायचे म्हणजे शुद्ध फसवेगिरी आणि अंधश्र्रद्धा आहे. हे ओळखून हरिभक्तीचा मार्ग प्रामाणिकपणे पालन करावयास शिकले पाहिजे.

-वृंदावनदास

Advertisement
Tags :

.