For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इच्छा, द्वेष, सुख, दु:ख हे विकार माणसाची मन:शांती बिघडवत असतात

06:28 AM Mar 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
इच्छा  द्वेष  सुख  दु ख हे विकार माणसाची मन शांती बिघडवत असतात
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

भगवंत म्हणाले, कर्मत्याग आणि कर्म करणे ह्या दोन्हीही गोष्टी मोक्ष मिळवून देतात. या दोहोंपैकी कर्मयोगच सर्वांना सुलभ असल्याने तो जास्त महत्त्वाचा आहे असे म्हणता येईल. निष्काम कर्मयोग आचरण्याला सरळ आहे. संन्यास घेऊन जे फळ मिळते तेच फळ कर्मयोग्याला सहजी प्राप्त होते. कर्मयोग आणि कर्मसंन्यास ह्या दोन्हीचे फळ एकच असते कारण कर्मयोगात मुरलेला विकारांपासून मुक्त असल्याने तो प्रीति-द्वेष, सुख-दुख, जय-पराजय इत्यादी द्वंद्वांनी म्हणजे परस्परविरोधी भावनांनी रहित असल्याने कर्मबंधापासून कोणत्याही प्रयत्नाशिवाय मुक्त होतो. अशी मुक्ती मिळवणे हेच संन्याशाचे ध्येय असल्याने कर्मयोगी आपोआपच कर्मसंन्यासी होतो.

तो जाणं नित्य-संन्यासी राग-द्वेष नसे जया । जो द्वंद्वावेगळा झाला सुखे बंधांतुनी सुटे ।।3 ।।

Advertisement

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणाले, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, संन्याशी तृप्त असल्याने, तो होऊन गेलेल्या गोष्टींची आठवण काढत नाही, काही मिळावे अशी इच्छा करत नाही, तो मेरु पर्वताप्रमाणे त्याच्या विचाराशी ठाम असतो. त्याला मी पणाचा विसर पडलेला असल्याने हे शक्य होते. मी व माझे ह्या दोन्ही गोष्टी विसरलेला असल्याने तो सदोदित संन्यासीच असतो, त्याला कशाची आवडनिवड असत नाही. ही गोष्ट सोपी नसल्याने त्याने ती प्रयत्नपूर्वक अंगी बाणवून घेतलेली असते. त्यामुळे त्याच्या स्वभावात बदल घडलेला असतो. आपली आवडनिवड जोपासण्यात काहीही अर्थ नाही हे त्याने मनोमन ओळखलेले असते. कारण सर्व गोष्टी ईश्वरी इच्छेनुसार घडून येतात ह्यावर त्याचा ठाम विश्वास असतो. ज्याला प्रीति-द्वेष, सुख-दुख, जय-पराजय ह्या परस्परविरोधी भावना शिवतसुद्धा नाहीत त्याला शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते.

माणसाला नेहमीच आवडीच्या गोष्टी आपल्याकडे हव्यातच असे वाटत असते. जर त्या मिळाल्या तर आनंद होतो, मिळाल्या नाहीत तर वाईट वाटते, त्या ज्याला मिळाल्या आहेत त्याचा द्वेष वाटू लागतो. हे विकार त्याची मन:शांती सतत बिघडवत असतात पण संन्यासी वृत्तीच्या माणसाने समोर दिसणाऱ्या गोष्टी हा केवळ भास आहे हे ओळखलेले असल्याने त्यातील निरर्थकता तो जाणून असतो त्यामुळे त्याला एखादी गोष्ट मिळाली न मिळाली तरी फरक पडत नाही. सर्व आवडनिवड सोडून देण्यासाठी माणसाला खूपच प्रिय असणाऱ्या घरादाराचा त्याग करावा लागेल असा एक समज असतो. परंतु तसे करण्याची गरज नाही असे माउली पुढे सांगतात, जर समोरच्या वस्तुत मन गुंतलं नसेल तर ती वस्तू समोर असली म्हणून बिघडत नाही. लहानपणीच्या खेळण्यांचे मोठेपणी आकर्षण वाटत नाही, त्यामुळे ती समोर असली तरी त्याकडे मनुष्य सहजी दुर्लक्ष करू शकतो, त्याप्रमाणे संन्याशाला संसारातील वस्तू समोर दिसत असल्या तरी त्यांचे आकर्षण वाटत नाही. त्या समोर असल्या तर त्याचा तो आनंद घेतो पण नसल्या तरीही त्याचे चालू शकते. तो कशातच गुंतलेला नसल्याने तो नि:संग भावनेने घरात राहू शकतो. अग्नी पेटलेला असतो तेव्हा त्यांची धग जाणवत असते पण जेव्हा तो विझतो तेव्हा त्यांची राख मागे शिल्लक राहते परंतु आता त्यातील धग जाणवत नसल्याने त्याला कापसातसुद्धा गुंडाळून ठेवता येते. त्याप्रमाणे ज्याने मन आणि बुद्धी ईश्वराला अर्पण केली आहे त्याच्या मनात कोणतेही विचार येत नसल्याने बुद्धीत कोणतेही संकल्प नसतात. त्यामुळे तो परिवारात असूनसुद्धा कर्मबंधात अडकत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.