नियमबाह्या मालमत्ता हस्तांतरण प्रकरणी शिंदीकुरबेट ग्राम पंचायतवर बडतर्फीची कारवाई
अध्यक्ष-उपाध्यक्षांसह 28 सदस्यांना अपात्र ठरविल्याने एकच खळबळ
बेळगाव : शिंदीकुरबेट, ता. गोकाक ग्राम पंचायतीत घडलेल्या नियमबाह्या मालमत्ता हस्तांतर प्रकरणासंबंधी सरकारने अध्यक्ष-उपाध्यक्षांसह 28 सदस्यांना अपात्र ठरविले असून पुढील सहा वर्षे निवडणुकीतही त्यांना सहभागी होता येत नाही. राज्य सरकारने केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ माजली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षांना सत्तेवरून बाजूला काढण्यात आले आहे. पंचायतराज व ग्रामीण विकास खात्याचे अप्पर मुख्य सचिव उमा महादेवन यांनी यासंबंधीचा निर्णय असलेला आदेश जारी केला आहे. ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष रेणुका इराप्पा पाटील, उपाध्यक्ष भीमाप्पा यल्लाप्पा बरनाळी यांना पदावरून बाजूला करण्यात आले आहे. 25 फेब्रुवारी 2022 व त्याच वर्षाच्या 25 मार्च रोजी झालेल्या ग्राम पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता गावातील काही मालमत्तांसंबंधी चुकीचा निर्णय घेण्यात आला होता. शांता नागाप्पा पोतदार यांच्या नावे असलेली मालमत्ता नियमबाह्यापणे रामचंद्र दानप्पा पोतदार यांच्या नावे वर्ग करण्यात आली होती.
यासंबंधीचा आरोप शाबित झाल्याने राज्य सरकारने अध्यक्ष, उपाध्यक्षांसह 28 जणांवर कारवाई केली आहे. अध्यक्ष रेणुका इराप्पा पाटील, उपाध्यक्ष भीमाप्पा यल्लाप्पा बरनाळी यांच्याबरोबरच फकिराप्पा भोई, गजानन पाटील, शांतव्वा कौजलगी, मारुती जाधव, अमृत काळ्यागोळ, रुक्सार जमादार, रुपा कंबार, शांतम्मा भोवी, सुरेखा पत्तार, इब्राहिम मुल्ला, चांदबी सौदागर, रामप्पा बेळगली, शमशाद सौदागर, मंजुळा करोशी, मंजुनाथ गुडक्षेत्र, रामकृष्ण गाडीवड्डर, सुमित्रा माय, पार्वती ज्योतन्नावर, अडव्याप्पा बेक्किन्नावर, सिद्धाप्पा कट्टीकार, बसलिंगाप्पा बजंत्री, लक्ष्मीबाई सूर्यवंशी, निसार अहमद जकाती, अशोक मेत्री, सुरेखा गाडीवड्डर व श्रीकांत काट्यागोळ या सदस्यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शिंदीकुरबेट ग्राम पंचायतीचे लोकनियुक्त सदस्य बडतर्फ झाल्यामुळे पंचायतीचे कामकाज कसे चालवणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कर्नाटक ग्राम स्वराज्य व पंचायतराज अधिनियम 1993 चे कलम 48(4), 48(5) अन्वये अध्यक्ष, उपाध्यक्षांना पदावरून हटविण्यात आले असून कलम 43(ए), (2) अन्वये सर्व 28 सदस्यांवर सहा वर्षांसाठी बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.