हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार दिशा
प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत अॅक्शन थ्रिलरपटात भूमिका
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आता हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. ऑस्कर विजेता दिग्दर्शक केविन स्पेसीचा चित्रपट होलीगार्ड्समध्ये ती काम करणार आहे. हा सुपरनॅचरल अॅक्शन थ्रिलर चित्रपट मेक्सिकोत चित्रित झाला असुन यात अनेक दिग्गज कलाकार काम करत आहेत. केविन स्पेसी 20 वर्षांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात परतले आहेत. होलीगार्ड्स एक सुपरनॅचरल अॅक्शन थ्रिलरपट असून तो स्टॅडिगार्ड्स वर्सेज होलीगार्ड्स नावाच्या फ्रँचाइजीचा हिस्सा आहे. यात दिशा पाटनीसोबत डॉल्फ लुंडग्रेन, टायरेस गिब्सन, ब्रियाना हिल्डेब्रँड दिसुन येणार आहे. याचे चित्रिकरण मेक्सिकोच्या डुरैंगो येथे झाले असून याचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला आहे. दिशाने 2015 मध्ये तेलगू चित्रपट लोफरद्वारे स्वत:च्या कारकीर्दीला प्रारंभ केला होता. 2016 मध्ये एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरीद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. यानंतर ती कुंग फू योगा चित्रपटात जॅकी चेनसोबत झळकली होती. तसेच बागी, भारत, मलंग, कल्कि 2898एडी, कंगुवा यासारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.