दिशा सालियन प्रकरणाचा तपास आता सीबीआयच्या एसपी सीमा पाहुजांकडे; नव्या एफआयआरनंतर तपासाला वेग
मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या नव्या तपासाची जबाबदारी सीबीआयच्या वरिष्ठ अधिकारी सीमा पाहुजा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणात एफआयआर दाखल केला असून, त्यानंतर तपासाला सुरुवात झाली आहे.
दिशा सालियन यांचा जून २०२० मध्ये मुंबईतील मालाड परिसरात इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे दिशा सालियन प्रकरण गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे.
सीमा पाहुजा कोण आहेत?
सीमा पाहुजा सध्या सीबीआयच्या विशेष गुन्हे विभागात पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासाचा त्यांना अनुभव आहे. हाथरस, उन्नाव आणि २०२४ मधील कोलकाता आरजी कर रुग्णालय प्रकरणाच्या तपासात त्यांनी भूमिका बजावली आहे. २०२१ मध्ये त्यांना ‘बेस्ट इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर’ पुरस्काराने सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले होते.
एफआयआरमध्ये गंभीर आरोपांचा समावेश
सीबीआयच्या एफआयआरमध्ये गुन्हेगारी कट, सामूहिक बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणे आणि अधिकृत कागदपत्रांमध्ये फेरफार केल्यासंबंधी आरोपांचा तपास करण्यासाठी कलमांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. मात्र, या टप्प्यावर एफआयआरमध्ये कोणत्याही व्यक्तीला आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. तपासात संबंधित व्यक्तींची भूमिका आणि उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सीबीआय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, दिनो मोरिया, सूरज पांचोली आणि अन्य काही व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्याचा उल्लेख असल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याचा अर्थ ते आरोपी आहेत असा होत नाही; त्यांची भूमिका तपासाचा भाग असल्याचे अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
पार्टीतील उपस्थितांची चौकशी होणार
सीबीआय तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात घटनाक्रमाशी संबंधित कागदपत्रे, आधीच्या तपासातील नोंदी, न्यायवैद्यकीय व शवविच्छेदन अहवाल तसेच घटनास्थळाची माहिती तपासणार आहे. दिशा सालियन यांच्या मृत्यूपूर्वी झालेल्या पार्टीत उपस्थित असलेल्या व्यक्तींचे जबाबही नोंदवले जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच डिजिटल पुरावे आणि इतर तांत्रिक माहितीची पडताळणी केली जाणार आहे.
दिशा सालियन यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती, आधीच्या तपासातील नोंदी व पुराव्यांमध्ये काही त्रुटी किंवा फेरफार झाला होता का आणि उपलब्ध पुराव्यांमधून कोणते तथ्य समोर येते, याचा तपास आता सीबीआयच्या पथकाकडून केला जाणार आहे. त्यामुळे पुढील तपासातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.