खोकल्यावरुन कळणार विकार
कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान युगाचा आता प्रारंभ झाला आहे. येत्या दहा वर्षांमध्ये हे तंत्रज्ञान पृथ्वी व्यापून टाकणार आहे. या तंत्रज्ञानाचा संचार सर्वच क्षेत्रांमध्ये होणार असून या क्षेत्रांमध्ये वैद्यकीय क्षेत्र प्रमुख असेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्ता किंवा एआयचा उपयोग करुन त्वरित, अचूक आणि अत्यल्प खर्चात रोगनिदान करणे शक्य होणार आहे. हे भविष्य आतापासूनच स्पष्ट दिसू लागले आहे. कर्नाटकातील एका स्टार्टअप कंपनीने कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे एक अॅप निर्माण केले आहे. या अॅपची क्षमता अशी आहे, की ते तुमच्या खोकल्याच्या ध्वनीवरुन तुम्हाला कोणता रोग किंवा विकार झाला आहे, याचे अचूक निदान करते, असे या कंपनीचे म्हणणे आहे. या अॅपला दिल्लीतील ‘एम्स’ या सरकारी संस्थेने मान्यताही दिली आहे. सध्या या अॅपची जोरदार चर्चा आहे.
हे अॅप कसे कार्य करते, ते जाणून घेणे स्वारस्यपूर्ण आहे. हे अॅप ज्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड केलेले आहे, त्या स्मार्टफोनजवळ आपण खोकल्यास त्यातील हे अॅप आपल्या खोकल्याच्या ध्वनीचे मुद्रण करुन घेते. या अॅपमध्ये बसविण्यात आलेले एआय सॉफ्टवेअर या ध्वनीचे वैद्यकीय विश्लेषण करते. आपल्या खोकल्याच्या ध्वनीचे एक विशिष्ट प्रकारचे ‘प्रारुप’ (पॅटर्न) असते. या प्रारुपावरुन आपली प्रकृती अशी आहे आणि आपल्याला कोणते विकार झालेले आहेत किंवा नाहीत, हे समजून येते, असे कंपनीचे प्रतिपादन आहे. हे अॅप आपली फुप्फुसे आणि श्वसनसंस्था यांचे विश्लेषण करते. आपल्याला फुप्फुसांचे विकार आहेत का आणि असल्यास त्यांची तीव्रता किती आहे, हे या विश्लेषणावरुन समजून येते. हे अॅप त्यासंबंधीचा अहवाल प्रशर्शित करते. यावरुन आपल्या फुप्फुसांची आणि श्वसनयंत्रणेची नेमकी स्थिती आपल्याला कळून येते. ही माहिती मिळाली की उपचार करणे सोपे होते. तसेच वेळेवर उपचार करणेही शक्य होते, असे या तंत्रज्ञानासंबंधात स्पष्ट करण्यात आले आहे. एम्समध्ये आतापर्यंत 450 रुग्णांच्या श्वसनरोगांचे आणि फुप्फुस रोगांचे निदान योग्य प्रकारे आणि कमी खर्चात करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. अर्थात, उपचार हे डॉक्टर्सनाच करावे लागतात. तसे स्वत:चे स्वत: करुन घेणे निश्चितच धोकादायक आहे. त्यामुळे या अॅपचा सर्वांसाठी उपलब्ध झाले, तरी त्याचा उपयोग स्वत:च्या मर्जीनुसार करु नये, असा इशाराही लवकरच देण्यात येणे शक्य आहे.