मणिपूरमधील मुख्यमंत्री बदलण्यासंबंधी चर्चा
बिरेन सिंह यांना दिल्लीत पाचारण
वृत्तसंस्था/ इंफाळ
अखेर 540 दिवसांच्या अशांततेनंतर मणिपूरमध्ये सरकारचे नेतृत्व बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात निवडणूक प्रचार सुरू होण्यापूर्वी भाजपचे केंद्रीय नेतृत्व मणिपूरमधील नेतृत्व बदलाचा निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा आहे. विद्यमान मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्याबाबत मैतेईचे आमदार दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. नुकतेच भाजपच्या 19 आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे नेतृत्त्व बदलाची मागणी केली होती. त्यानंतर इंफाळ ते दिल्लीपर्यंत मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात भाजपचे 32 आमदार असून त्यापैकी 19 आमदारांनी बिरेन सिंग यांना हटवल्याशिवाय शांतता नांदू शकत नसल्याचे केंद्रीय नेतृत्वासमोर स्पष्ट केले आहे. पक्षनेतृत्वाने ही मागणी गांभीर्याने घेत बिरेन सिंग यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्षा शारदादेवी यांना पाचारण केले असून दोघेही सध्या दिल्लीत आहेत. येत्या दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री बदलाबाबत निर्णय होऊ शकतो, असे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
सध्या मुख्यमंत्रिपदासाठी चार नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्ष सत्यब्रत सिंह यांचे नाव आघाडीवर आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या 6 पानी पत्रात विधानसभा अध्यक्ष सत्यब्रत यांची स्वाक्षरी सर्वात वर आहे. याला सर्व 19 आमदारांनी सहमती दर्शवली आहे.