फोर्ट रोडवर एकेरी वाहतुकीसाठी चर्चा
पोलीस आयुक्तांनी दिली भेट : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
बेळगाव : शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून एकेरी मार्गाचा पर्याय अवलंबला जात आहे. जुना धारवाड रोड येथील जिजामाता सर्कल ते देशपांडे पेट्रोल पंप व तेथून खिमजीभाई पेट्रोल पंपापर्यंत या दोन रस्त्यांवर एकेरी वाहतूक करण्यासंदर्भात फोर्ट रोड येथील व्यापाऱ्यांसोबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांनी सूचना केल्याने याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले. मंगळवारी भरतेश कॉलेजमध्ये व्यापारी व पोलिसांची संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये वाहतूक कोंडी संदर्भात व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. प्रारंभी फोर्ट रोड येथील व्यापारी असोशिएशनचे पदाधिकारी शरद पाटील यांनी फोर्ट रोड परिसरात उद्भवलेल्या समस्या मांडल्या. दुकानांसमोर लावल्या जाणाऱ्या वाहनांमुळेच अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे बाहेरून येणारे ग्राहकदेखील दुकानांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या दुकानासमोरील लावलेली वाहने हटविल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
बेळगाव शहरात एकूण 23 ट्रॅफिक सिग्नल असून ज्या ठिकाणी रहदारी कमी आहे. अशा ठिकाणचा सिग्नलचा वेळ कमी करून नागरिकांचा वेळ वाचविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोर्ट रोड येथील वाहतूक कोंडी कमी झाल्यास व्यापार वाढण्यासाठी मदत होणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. काही व्यापाऱ्यांनी दुभाजकांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर देशपांडे पेट्रोल पंप कॉर्नरवर रहदारी पोलिसाची नेमणूक केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही. अशा सूचना मांडण्यात आल्या. यावेळी रहदारी पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्तांकडून फोर्ट रोड येथे पाहणी
वाहतूक कोंडीबाबत झालेल्या बैठकीनंतर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी फोर्ट रोड परिसराची पाहणी केली. देशपांडे पेट्रोल पंप कॉर्नर येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात आसपासच्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली. सध्या फुलबाग गल्ली रोड बंद असल्याने वाहतूक कोंडी कमी आहे. परंतु जेव्हा तो रोड सुरू होईल. तेव्हा वाहतूक कोंडीत अधिक भर पडेल. यासंदर्भात त्यांनी या दोन्ही रस्त्यांची पाहणी करून येथील परिस्थिती जाणून घेतली.