जयशंकर-पुतीन यांच्यात चर्चा
द्विपक्षीय संबंध, जागतिक घडामोडींवर विचारविमर्श
► वृत्तसंस्था/ मॉस्को
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली आहे. या चर्चेत द्विपक्षीय संबंध आणि जागतिक घडामोडी हे प्रमुख विषय असल्याची माहिती भारताकडून देण्यात आली आहे. जयशंकर यांच्या रशिया दौऱ्याचा प्रारंभ रविवारपासून झालेला आहे. सोधवारी हा दौरा आटोपून जयशंकर फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात गेली चार वर्षे युद्ध होत आहे. रशियाने युद्ध थांबवावे, म्हणून दबाव आणण्यासाठी अमेरिकेने रशियावर तेल निर्बंध लागू केलेले आहेत. भारत हा रशियाचा सर्वात मोठा तेलखरेदीदार देश आहे. त्यामुळे या भेटीला महत्व आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन सप्टेंबरमध्ये भारतात येत आहेत. 12 आणि 13 सप्टेंबर या दिवशी भारतात ब्रिक्स परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या निमित्ताने या परिषदेच्या सर्व सदस्य देशांचे प्रमुख भारतात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांच्यातही ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत महत्वाची चचां होण्याची शक्यता आहे. जयशंकर यांनी सोमवारी रशियाचे उपाध्यक्ष डेनिस मांतुरो यांच्यासह एका कार्यक्रमात भाग घेतला. दोन्ही नेत्यांनी या कार्यक्रमाचे सहअध्यक्षपद स्वीकारले होते. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध आता अधिक दृढ आणि स्थिर झाले असून दोन्ही देश त्यांची भूमिका या संबंधांमध्ये योग्यरित्या साकारत आहेत, अशी भलावण जयशंकर यांनी केली. तत्पूर्वी जयशंकर यांनी रशियाच्या उच्च नेत्यांसमवेत द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा, संरक्षण, तंत्रज्ञान आदानप्रदान आदी विषयांवर चर्चा केली.
आजपासून फ्रान्सच्या दौऱ्यावर
जयशंकर यांनी आपला रशिया दौरा झाल्यानंतर फ्रान्सच्या दौऱ्याला प्रारंभ केला आहे. फ्रान्समध्ये त्यांची त्या देशाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत फ्रान्सकडून आणखी राफेल युद्ध विमाने खरेदी करण्याच्या विचारात आहे. 114 विमानांचा करार आकाराला येऊ शकतो. जयशंकर यांच्या या फ्रान्स दौऱ्यात या विषयावरही चर्चा होऊ शकते. रशियानंतर फ्रान्स हा भारताचा सर्वात मोठा शस्त्रपुरवठादार देश आहे. भारत फ्रान्सकडून खरेदी करण्याचा विचार करीत असलेल्या 114 राफेल विमानांपैकी 80 हून अधिक विमानांची जोडणी भारतात केली जाण्याचीही शक्यता आहे. भारत फ्रात्नकडून तंत्रज्ञान हस्तांतरण करुन घेण्याचाही प्रयत्न करीत आहे. राफेल विमान हे भारताच्या वायुदलाचा कणा म्हणून ओळखले जाते. फ्रान्सच्या दौऱ्यात जयशंकर जागतिक घडामोडींविषयी चर्चा करतील. युरोपियन महासंघासंबंधीही बोलणी होऊ शकतात.