नितीश-तेजस्वी यांच्यात ‘गुफ्तगू’; लोकसभा निवडणुकातील जागावाटपाबाबत चर्चा
लोकसभा निवडणुकातील जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचा अंदाज
वृत्तसंस्था /पाटणा
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गुऊवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेत घेत चर्चा केली. नवीन वर्षात नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांची ही पहिलीच भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष बैठकांमध्ये व्यस्त असताना आता बिहारमधील या दोन नेत्यांच्या भेटीची राजकीय पातळीवर वेगळीच चर्चा रंगली आहे. बराचवेळ रंगलेल्या या चर्चेतील नेमका तपशील प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचलेला नाही. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. पण, मुख्यमंत्री नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्यातील बैठक अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जात आहे. खरे तर नववर्षानिमित्त या दोन्ही नेत्यांच्या भेटीत ‘इंडिया’ आघाडीतील जागावाटपापासून इतर मुद्यांवर चर्चा होण्याचा तर्क बांधला जात आहे. बिहारमधील सततच्या बदलत्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याची भेट घेतली नव्हती. 1 जानेवारीला नववर्षाच्या मुहूर्तावरही या दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही. यापूर्वी नितीशकुमार हे लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी जात असत किंवा लालू यादव स्वत: नितीशकुमार यांना भेटण्यासाठी येत असत. पण काही दिवसांपासून दोघांमध्ये भेटाभेट झालेली नाही. मात्र, गुरुवारी तेजस्वी यादव स्वत: नितीशकुमारांना भेटायला पोहोचले होते. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट पूर्वनियोजित असल्याचे सांगण्यात आल्यामुळे बैठकीला अनेक अर्थ आहेत. बिहारची सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.