उचगाव ग्रामपंचायत बैठकीत विविध विकासकामांबाबत चर्चा
सुसज्ज वाचनालय-संगणक विभाग उभारण्याचा सर्वानुमते निर्णय : सदस्यांचा पाठिंबा
वार्ताहर /उचगाव
विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सुसज्ज वाचनालय, ग्रंथालय आणि संगणक विभाग उभारण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून सर्व कामे पूर्णत्वास नेण्याचेही ठरविले. चौकातील बसस्थानकाचेही लवकरच नूतनीकरण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा मथुरा तेरसे होत्या. सचिव सुमेरा मोकाशी यांनी प्रास्ताविक करून कागदपत्राचे वाचन केले. उचगाव पश्चिम भागातील माजी सैनिकांना कार्यालयासाठी जागा देणे, गावामध्ये एखादा नागरिक मृत्यू पावल्यास त्याला नेण्यासाठी तिरडीची सोय करणे, अशा सूचना यावेळी सदस्यांनी मांडल्या. वरील सर्व मुद्यांना सर्वांनी सहमती दर्शवली. गावासाठी सुसज्ज अत्याधुनिक वाचनालय बांधण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. विद्यार्थी, नागरिकांसाठी ग्रामपंचायतीतर्फे अत्याधुनिक वाचनालय बांधण्यात येईल व त्या ठिकाणी सर्व भाषेतील वर्तमानपत्रे, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारी पुस्तके, संगणक आदी ठेवण्यात येईल.
पाणी प्रश्नावर चर्चा
बैठकीमध्ये गावच्या पाणी प्रŽाविषयी चर्चा करण्यात आली. जलजीवन योजनेमार्फत गावात झालेल्या कामामधील राहिलेली अपुरी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. तसेच सध्या पावसाळा सुरू असल्याने गावच्या सर्व सार्वजनिक विहिरीमध्ये जंतुनाशक पावडर, गावामध्ये कीटकनाशक पावडरची पुन्हा फवारणी करण्यात येईल असे सांगून गावच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याबाबत चर्चा करण्यात आली. ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट जोडणी केलेली नाही त्याठिकाणी लवकरात लवकर जोडणी करण्यात येईल, असाही ठराव करण्यात आला. सर्व ठरावांना ग्रामपंचायत सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दिला. बैठकीला ग्रामपंचायत अध्यक्षा, उपाध्यक्षसह सदस्य, सचिव व कर्मचारी उपस्थित होते.