उचगाव ग्रामसभेत विविध समस्यांवर चर्चा
अनेक ठराव संमत : सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना देण्यात आली माहिती : सभा खेळीमेळीत पार : परिसर स्वच्छतेवरही भर
वार्ताहर/उचगाव
उचगाव ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील नागरिकांसाठी गुरुवार दि. 5 जून रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामस्थांनी अनेक समस्या आणि ठराव करण्यासंदर्भात आपली मते मांडली. यावर ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. या ग्रामसभेच्या अध्यक्षपदी ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे होत्या. प्रारंभी पीडीओ शिवाजी मडिवाळ यांनी या ग्रामसभेचा उद्देश आणि सविस्तर माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले. ग्रामसभेला अक्षरदासोह डिपार्टमेंटचे सहाय्यक निर्देशक आर.सी. मुदकनगौडा हे नोडल अधिकारी म्हणून उपस्थित होते. तसेच ग्रा.पं. सदस्य व विविध खात्यातील अधिकारी ग्रामसभेत उपस्थित होते. या ग्रामसभेमध्ये हेस्कॉम खात्याचे सेक्शन ऑफिसर सचिन, कृषी खात्याचे अधिकारी मल्लेश नाईक, आरोग्य खात्याकडून महिला वैद्याधिकारी डॉ. स्मिता गोडसे, व्हेटरनरी खात्याकडून दीपक एल्गार, हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटकडून विजयकुमार, कर्नाटक विकास ग्रामीण बँकेकडून बँकेच्या मॅनेजर तसेच रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे कोष्टी या सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्याची माहिती ग्रामसभेमध्ये नागरिकांना दिली. याबरोबरच विविध योजना, सबसिडी यासंदर्भातही माहिती दिली.
ग्रामसभेत झालेले महत्त्वपूर्ण ठराव
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांची संख्या वाढवणे, कर्मचारी वर्गाची भरती करणे, परिसराची स्वच्छता करणे, डिलिव्हरी डिपार्टमेंट पुन्हा सुरू करणे, श्वानदंश, सर्पदंश झाल्यानंतरची इंजेक्शन ठेवणे आणि सदर हॉस्पिटल 30 खाटांचे सुसज्ज करण्यात यावे.
- हेस्कॉमकडून सुरळीत वीजपुरवठा ठेवावा.
- उचगाव प्राथमिक मराठी शाळेमध्ये सुरू करण्यात आलेला आठवीचा वर्ग बंद करण्यात यावा. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सातवी पास विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले त्वरित द्यावेत. विद्यार्थ्यांवरती जबरदस्ती करण्यात येऊ नये.
- ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी कोणताही वैयक्तिक फलक लावण्यात येऊ नये. फलक लावण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घ्यावी.
- कृषी खात्याकडून मिळणाऱ्या विविध योजना, बी बियाण्यांची सातत्याने शेतकऱ्यांना माहिती द्यावी. शेतकऱ्यांना मिळणारी ताडपत्री तीन वर्षासाठी एकदा आहे. ती आता वर्षातून एकदा मिळावी.
- उचगाव स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंटीकरण, डांबरीकरण करण्यात यावे. स्मशानभूमीत कंपाउंड वॉल, दिवाबत्ती, निवारा शेड, स्वच्छता ठेवण्यात यावी.
- गावामध्ये यापूर्वी डॉल्बीमुक्त गाव असा ठराव करण्यात आलेला आहे. त्याची कार्यवाही कडक करण्यात यावी. रात्री दहानंतर कोणतेही साऊंड सिस्टिम चालू ठेवल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
- उचगाव गावातील देवस्की पंच कमिटीला ग्रामपंचायतने स्वतंत्र हॉल बैठकीसाठी उपलब्ध करून द्यावा.
- सरकारी ज्या मालमत्ता आहेत त्याचा सर्व्हे करून त्याचे संरक्षण करावे व अतिक्रमण थांबवावे.
- नागरिकांनी कचरागाडीतच कचरा टाकून गावाची स्वच्छता राखावी.
- उचगाव परिसरात हेस्कॉमच्या शेतवडीतून ओढलेल्या तारा, लोंबकळत आहेत. त्यांची दुरुस्ती करावी आणि कलंडलेले विद्युतखांब सरळ करण्यात यावे.
अशाप्रकारचे विविध ठराव या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आले.