औषधांच्या कमतरतेच्या मुद्द्यावर आज चर्चा
चर्चेला परवानगीसाठी विरोधकांची मागणी
बेंगळूर : राज्यातील सरकारी ऊग्णालयांमध्ये औषधांच्या कमतरतेचा मुद्दा गुरुवारी विधानसभेत उपस्थित करून चर्चेला परवानगी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली. यावर उत्तर देताना सभापती यू. टी. खादर यांनी शुक्रवारी चर्चेला परवानगी देणार असल्याचे सांगितले. प्रश्नोत्तरांचा कालावधी संपल्यानंतर विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी स्थगन प्रस्तावा अंतर्गत हा मुद्दा उपस्थित केला. राज्यात औषधांचा तुटवडा आहे. आरोग्यमंत्री निरोगी आहेत. पण आरोग्य खाते आजारी आहे, अशी टीका केली.
सरकारी ऊग्णालयांमध्ये गरिबांना औषधे मिळत नाहीत. डॉक्टरांनीही आंदोलन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सरकारने ते तात्पुरते थांबवले आहे. औषधांच्या कमतरतेमुळे लोकांना समस्या निर्माण होत आहेत. औषधांच्या कमतरतेव्यतिरिक्त, तुम्ही 270 प्राथमिक आरोग्य केंद्रे बंद करून डॉक्टरांची बदली करण्याचा विचार करत आहात. औषधांशिवाय लोक त्रस्त आहेत, असेही आर. अशोक यांनी स्पष्ट केले. सरकारी ऊग्णालयांच्या डॉक्टर संघटनेने सरकारला पत्र लिहून ऊग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे ऊग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. हे टाळण्याची विनंती त्यांनी केली आहे.
राज्यात औषधांची कमतरता नाही : आरोग्यमंत्री
यावेळी आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी आम्ही या मुद्द्यावर चर्चेला तयार आहोत. सर्व माहिती दिली जाईल. राज्यात कोणत्याही सरकारी रुग्णालयात औषधांची कमतरता नाही. औषधे उपलब्ध आहेत, असे सांगितले. यानंतर सभापतींनी शुक्रवारी चर्चेला परवानगी देणार असल्याचे स्पष्ट केले.